मातोश्री पानंद शेतरस्ते योजनेत घोटाळा – 12 जणावर उस्मानाबाद पोलिसात गुन्हा नोंद
उस्मानाबाद – समय सारथी
मातोश्री पानंद शेतरस्ते योजनेत 30 लाख 98 हजारांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले असून उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार पोलिसात 6 शासकीय अधिकारी व 6 बँक खातेदार असे 12 जणावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तत्कालीन गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, कंत्राटी सहायक यासह 12 जणावर गुन्हा नोंद करण्यात आला असून बोगस मजूर, बँक खाते तयार करुन पवारवाडी या गावात 30 लाख 98 हजारांचा घोटाळा केला आहे. उस्मानाबाद येथील आनंद नगर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दैनिक समय सारथी वृत्तपत्राने मातोश्री पानंदसह उस्मानाबाद पंचायत समितीमधील विविध योजनात घोटाळा होत असल्याचे वृत्त पुराव्यासह दिले होते त्यानंतर चौकशी व कारवाईला सुरुवात झाली आहे. शेवगा लागवड योजनेची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. उस्मानाबाद सारखाच प्रकार तुळजापूर, भुम, कळंब पंचायत समितीत असून सर्व पंचायत समिती व त्याच्या रोहयो योजनेच्या विशेष लेखापरीक्षणची गरज आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील पवारवाडी येथे शेतरस्ते काम न करता लाखो रुपये मजुरांच्या बोगस बँक खात्यावर उचलल्याचे चौकशी अहवालात समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. गेल्या महिन्यात रोहयोतील घरकुल, शोषखड्डे योजनेत घोटाळा उघड झाल्यानंतर आता मातोश्री पानंद योजनेत घोटाळा उघड झाला आहे. घोटाळ्याचा आकडा कोट्याधीच्या घरात आहे.
उस्मानाबाद पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी सुरेश तायडे, पवारवाडी गावाचे ग्रामसेवक अंगद आगळे, आर जे लोध, ग्रामरोजगार सेवक अशोक मुंडे, पंचायत समिती रोहयो विभागातील कंत्राटी सहायक स्वाती कांबळे, क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर विश्वनाथ राऊत या 6 शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासह ज्यांच्या नावावर हे पैसे वर्ग करण्यात आले ते उपळा या गावातील प्रभावती लोहार, सोमनाथ लोहार, अनुराधा रणसिंग, विजयकुमार रणसिंग, अश्विन गायकवाड व रोहित नवले हे 6 असे 12 जणावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बिडीओ नंदकुमार शेरखाने यांच्या फिर्यादीवरून 420,406,409,465,467,468,470,471,477 व 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अंजुमरा शेख याच्याकडे तपास देण्यात आला आहे.