माझे कुटुंब , माझी जबादारी – 5 लाख नागरिकांची तपासणी पूर्ण
सारी, कोविडसह जुनाट आजार असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना मोठ्या प्रमाणात राबविणे सुरू आहे. त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम राबविली जात आहे या अंतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांची वैद्यकीय माहिती व सर्वेक्षण केले जात आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात असलेल्या 16 लाख 76 हजार 662 लोकसंख्या पैकी 24 एप्रिल पर्यंत 4 लाख 99 हजार 222 नागरिकांची माहिती घेण्यात आली आहे. 3 लाख 45 हजार 677 कुटुंब पैकी आत्तापर्यंत 1 लाख 6 हजार 304 कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी 1 हजार 140 पथके स्थापन करण्यात आली असून त्यात 2 हजार 908 कर्मचारी कार्यरत आहेत.
माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणामध्ये आतापर्यंत 1 हजार 884 संशयित रुग्ण सापडले असून त्यात 121 जण सारीचे रुग्ण आहेत तर 293 हे कोरोनाचे आहेत. 14 हजार 204 नागरिकांना विविध व्याधी सापडल्या असून त्यानुसार उपचार सुरू आहेत.
कोरोनाची कोणतीही प्राथमिक लक्षणे अंगावर न काढता वेळीच तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे जेणेकरून मृत्यू टाळता येऊ शकतो , नागरिकांनी काळजी घेण्याचे व तात्काळ उपचार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस , महसूल , जिल्हा परिषद , नगर परिषद यासह इतर शासकीय यंत्रणा या मोहिमेत सहभागी असून त्यांना आमदार , स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य मिळत आहे