महावितरणच्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा – ट्रान्सफॉर्मरचा निधी 3 वर्षांपासुन अखर्चित
शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी जाग येईना – भाजप आमदार सुरेश धस यांची मागणी
धाराशिव – समय सारथी
शेतकऱ्यांना वीजपुरवठ्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी दिलेला जिल्हा वार्षिक नियोजन समितीतील निधी गेली 3 वर्षांपासून अखर्चित ठेवल्या प्रश्ननी विधानपरिषदेचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
वीज न मिळाल्याने पिके करपली, शेती करता आली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला व अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांना आत्महत्यास प्रवृत्ती करणाऱ्या महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी आमदार धस यांनी केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता यांच्याकडुन तात्काळ खुलासा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी मागितला आहे.
धाराशिव जिल्ह्यामध्ये सन 2021, 2022 व 2023 ते आतापर्यंत जिल्हा विकास निधीमधील शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने व सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र महावितरणने निधी देऊनही ते बसवले नाहीत. शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे महावितरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांची चौकशी करुन सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आमदार धस यांनी केली आहे.
महावितरण अधिकाऱ्यांचा मुजोरपणा वाढला असुन यापूर्वी खुद्द पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी आढावा बैठक घेऊन माहिती घेत कारवाईच्या सूचना दिल्या मात्र काहीही न केल्याने मंत्री सावंत यांनी महावितरण अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती.