मशाल कोणाची शिवसेनेची – भवानी चौक येथे मशाल पेटवून शिवसैनिकांचा जयघोष
उस्मानाबाद – समय सारथी
मशाल कोणाची शिवसेनेची, मशाल कोणाची आई तुळजाभवानी देवीची अशी घोषणा देत उस्मानाबाद शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी भवानी चौक येथे मशाल पेटवून, फटाके फोडून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला, आगामी काळात विरोधकांना पराभूत करू असे सांगत त्यांनी ही मशाल आई तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे रविवारी या तिघांनी लिंबराज डुकरे यांच्या पुढाकारातून भवानी चौक येथे मशालीचे उदघाटन केले होते त्यानंतर योगायोग म्हणजे सोमवारी ठाकरे गटाला हे चिन्ह मिळाले, उस्मानाबाद शहरातील शिवसैनिकांचे भवानी चौक केंद्र बिंदू ठरला. आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक निधीतून या मशालीचे व भवानी चौक सुशोभीकरण काम करण्यात आले आहे. शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत जल्लोष केला यामुळे एक नवचैतन्य निर्माण झाले होते.
आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया –
मी आणि आमचे खासदार ओमराजे निंबाळकर हे तर झुकलेच नाहीत, मात्र शिवसैनिक देखील झुकला नाही. काही लोकप्रतिनिधी जरी गेले असले तरी खरे शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत असं पाटील यांनी म्हटलं आहे. आज हे जे मशाल चिन्ह आम्हाला मिळालेले आहे, ते आई तुळजाभवानीने ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना देऊन आशीर्वाद दिला होता, तेही दुर्जनांचा नाश करण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्याला देखील आई तुळजाभवानीनेच आपल्याला मशाल हे चिन्ह दिले असल्याचे कैलास पाटील यांनी म्हटले आहे. आई तुळजाभवानीने नवरात्रीच्या पावन पर्वत आई तुळजाभवानीची भवानी ज्योत मशाल हे निवडणूक चिन्ह म्हणून दिलेला आहे त्याप्रमाणे आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निश्चितच सुराज्य उभे राहील असे पाटील म्हणाले.
खासदार ओमराजे यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रातील सामान्य जनता सार्वत्रिक निवडणुकीची वाट पाहत आहे, निवडणूकीत आई तुळजाभवानी च्या ज्योतीच्या पुढचं म्हणजेच मशालीच्या पुढचं बटन दाबून ही जनता जे षड्यंत्र करणाऱ्या लोकांना उत्तर देईल असे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले. निष्ठा काय असते ही बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकाला शिकवली आणि निष्ठे प्रती कशा पद्धतीने आपलं वागणं असलं पाहिजे हे शिकवलं, मला वाटते तीच निष्ठा व्यक्त करायची वेळ आज सगळ्या शिवसैनिक मध्ये आहे मागच्या तीन महिन्यापासून जे गलिच्छ प्रकारचे राजकारण महाराष्ट्रामध्ये चाललय ज्या पद्धतीने शिवसेना हे नाव पुसायचं शिवसेनेचा धनुष्यबाण हे चिन्ह पाठवायचं हे सामान्य माणूस शिवसेनेचे कदापिही सहन करू शकत नाही,आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने साक्षात भवानी ज्योत या ठिकाणी शिवसेनेला निशाणी म्हणून मिळालेले आहे याचा प्रचंड प्रमाणात आनंद त्या ठिकाणी प्रत्येक शिवसैनिकाला आहे असे ओमराजे म्हणाले.महाराष्ट्रातील जनतेला एवढंच सांगायचंय की सामान्य लोक मागच्या तीन महिन्यापासून चाललेलं राजकारण विसरलेली नाहीत लोक वाट बघतायेत ती फक्त सार्वत्रिक निवडणुकीचे आणि जेव्हा केव्हा सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी होईल तेव्हा प्रचंड प्रमाणात याच भवानी ज्योतीच्या पुढचं म्हणजेच मशालीच्या पुढचं बटन दाबून ही जनता जे षड्यंत्र करणारी लोक आहेत जे षड्यंत्राच्या पाठीशी आहेत आणि जिथे सहभागी आहेत त्यांना उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
नगराध्यक्ष मकरंद राजे यांची प्रतिक्रिया –
उस्मानाबाद जिल्हा हा बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा जिल्हा असून तो शिवसेनेचा कायम बालेकिल्ला राहिला आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिले होते ते पुसण्याचे पाप यांनी केले. उदघाटन केल्यावर अवघ्या 24 तासात मशाल हे चिन्ह मिळाले यापुढे हा जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला म्हणून राहील असा विश्वास नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी व्यक्त केला. शिवसेना व उद्धव ठाकरे ही नावे कोणी वेगळी करू शकत नाही, सामान्य शिवसैनिकाला हे षडयंत्र आवडले नाही त्यामुळे आगामी काळात गद्दारांना पराभूत करुन धडा शिकवू आणि राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार पुन्हा आणू असा निर्धार निंबाळकर यांनी व्यक्त केला.