मला आपल्याशी बोलायचंय, माजी मंत्री शंकरराव गडाख साधणार कार्यकर्त्यांशी संवाद
कोणता झेंडा घेऊ हाती ? – अपक्ष निवडून आलेले असताना दिली आहे शिवसेनेला साथ
उस्मानाबाद – समय सारथी
मला आपल्याशी बोलायचंय असे सांगत माजी मंत्री तथा उस्मानाबादचे माजी पालकमंत्री शंकरराव गडाख पाटील हे कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत. मला काही बोलायचंय या पोस्टमुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे मात्र आपण शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे शंकरराव गडाख यांनी सांगितले आहे.
गडाख हे अपक्ष निवडून आले होते त्यानंतर ते शिवसेनेच्या कोट्यातून जलसंधारण मंत्री झाले होते व त्यानंतर त्यांनी मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच त्यांना उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले होते.
गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना फोडून राज्यात सत्तानंतर केले त्यावेळी शिवसेनेचे अनेक मंत्री, आमदार हे शिंदे गटात सहभागी झाले होते. गडाख हे अपक्ष निवडून आलेले असल्याने त्यांना पक्षाचा व्हीप लागू होत नाही असे असतानाही त्यांनी शिवसेनेची पर्यायाने महाविकास आघाडीची साथ सोडली नाही. गडाख यांनी विधानसभा अध्यक्ष निवडी वेळी व शिंदे गट व भाजप सरकारला बहुमत सिद्ध करायच्या वेळी शिवसेनेच्या बाजूने मतदान केले. सत्तापालट झाल्यानंतर या सर्व घडामोडीपासून गडाख हे कोसोदूरच राहिले मात्र आता गडाख हे त्यांच्या समर्थकांचा मेळावा घेऊन मला आपल्याशी बोलायचंय असे म्हणल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात असून चर्चेला उधाण आले आहे. शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर संतोष बांगरसहा अन्य काही नेते शिवसेना सोडून त्या गटात सहभागी झाले आहेत तर अनेक त्या मार्गांवर आहेत.
नमस्कार गेल्या काही दिवसापासून घडलेल्या घटना त्यातून झालेले आरोप- प्रत्यारोप सध्या निर्माण झालेल्या राजकीय घडामोडीवर मला आपणा सर्वांशी संवाद साधायचा आहे. या आशयाचे पोस्ट गडाख यांनी केले आहे. सोनाई येथील पब्लिक स्कूल येथे मला आपल्याला काही बोलायचे या बॅनर खाली शंकरराव गडाख पाटील हे 11 जुलै 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता संवाद साधणार असून या मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन गडाख यांनी केले आहे. कार्यकर्ते यांच्या बांधणीसाठी हा मेळावा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.