मराठा आरक्षण आंदोलन पेटले – उद्या सर्व गावात, शहरात उपोषण आंदोलने
मंत्र्यांना जिल्हा प्रवेश बंदीचा इशारा , हिम्मत असेल तर फिरून दाखवा – आमदार राणाजगजीतसिंह पाटील
उस्मानाबाद – समय सारथी
खासदार छ्त्रपती संभाजीराजे भोसले यांच्या मराठा आरक्षण मागणी व आमरण उपोषण समर्थनार्थ उद्या उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व गावात ग्रामपंचायती समोर तर शहरात तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे तसेच मागण्या मान्य होईपर्यत मंत्र्यांना जिल्हा प्रवेश बंदी करण्याचा इशारा तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला आहे.ठाकरे सरकार प्रत्येक अर्थाने गद्दार निघाले असून दिले, आश्वासने पाळली नाहीत. राज्य सरकारमधील मंत्र्यांची हिम्मत असेल तर त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात येऊन दाखवावे, जिल्ह्यात आलात तर प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा पाटील यांनी दिला.सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे बैठक लावावी असे ते म्हणाले.
छत्रपती संभाजी राजे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला व आमरण उपोषण आंदोलनाला उस्मानाबाद जिल्ह्यात वाढता पाठिंबा मिळत आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्या राज्य सरकारकडे केल्या होत्या परंतु त्या पुर्ण न झाल्याने खा छ्त्रपती संभाजीराजे उपोषणास बसले आहेत त्यांच्या समर्थनार्थ भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापुरात लाक्षणीक उपोषण केले.
उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायत कार्यालय , जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण करून उद्या दुपारी पुन्हा पुढील आंदोलनाची दिशा व रणनीती ठरवू असे सांगत सत्ताधारी आमदार , खासदारांनी पक्षीय बाबी बाजूला ठेवून जबाबदारी स्वीकारावी व मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांची बैठक लावावी असे आवाहन केले. छत्रपतींच उपोषण संपेपर्यंत कोणत्याही मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, मंत्री आल्यास मोठया रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिला आहे.