मयत व्यक्ती चक्क रोजगार हमीच्या कामावर मजुर
खेड येथील घोटाळ्यात 3 जण दोषी – स्वतंत्र चौकशी
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद पंचायत समितीच्या शोषखड्डे घोटाळ्याचा हळूहळू उलघडा होत असून अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. तालुक्यातील खेड या गावात चक्क 10 ते 12 मयत व्यक्तींना कागदोपत्री रोहयोच्या कामावर मजुर दाखविण्यात आले आहे तर 7-8 जण हे पुणेसह अन्य मोठ्या शहरात खासगी कंपनीत कामाला असताना त्यांना कागदोपत्री मजूर दाखवले आहे. मयत व्यक्तींनी कामाची मागणी केली शिवाय त्यांनी रोहयो कामावर हजर राहत काम केल्याचे कागदोपत्री मस्टरवर दाखविले आहे, अत्यंत निंदनीय असलेल्या या प्रकाराची तक्रार करण्यात आली आहे. या घोटाळ्यात तत्कालीन ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक व तांत्रिक सहायक दोषी असल्याचा अहवाल दिला आहे तर त्यात 20 लाख पेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे नमूद केले आहे.
खेड येथील घोटाळ्याची तक्रार विनोद राजेंद्र गरड यांनी रोहयो विभागाच्या जिल्हा तक्रार निवारण प्राधिकारी यांच्याकडे केली असून या प्रकरणांची स्वतंत्र सुनावणी सुरु आहे. न्यायायीन अधिकार असलेल्या या समितीकडे 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. खेड येथील प्रकार उघड झाल्याने या शोषखड्डे घोटाळ्याला एक वेगळे व्यापक रूप येणार असून त्याची व्याप्ती वाढणार आहे.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत खेड या गावात फेब्रुवारी 2022 मध्ये सार्वजनिक शोषखड्याचे काम करण्यात आले मात्र अनेक ठिकाणी बोगस मजुरांची नोंदणी करीत त्यांनी काम केल्याचे दाखवीत अपहार केल्याची तक्रार केली आहे. मयत असलेल्या लोकांच्या नावाने काम मागणी नमुना 4 तयार करून त्यांनी काम केल्याचे दाखविले आहे.
उत्तरेश्वर आवटे हे 2 वर्षांपूर्वी मयत झालेले असताना त्यांनी काम केल्याचे दाखविले आहे तर गजराबाई उत्तरेश्वर आवटे व लक्ष्मण कचरू आवटे हे दोघे 10 वर्षांपूर्वी, येडबा बाजीराव गरड हे 2 वर्षापूर्वी, कचरू देवबा आवटे हे 3 वर्षांपूर्वी, शुभाबाई कचरू आवटे व दगडू गेना आवटे हे दोघे 5 वर्षांपूर्वी, श्रावण धोंडिबा शिरसाट हे 15 वर्षांपूर्वी, शांताबाई श्रावण शिरसट ह्या 7 वर्षांपूर्वी, रुक्मिणीबाई दगडू आवटे ह्या 6 वर्षापूर्वी व एकनाथ काशिनाथ भुसारे हे मयत असताना त्यांनी कामाची मागणी व प्रत्यक्ष काम केल्याचे हजेरीपटावर दाखविण्यात आले आहे. या सर्वांचे हजेरीपट व मृत्यू प्रमाणपत्र पुरावा म्हणून तक्रार निवारण प्राधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहेत.
पुणे येथील खासगी कंपनीत अभियंता असलेले वैभव टकले, धनाजी शिरसाट, लहू शिरसाट, राहुल गरड व अमोल गरड तर बंगलोर येथे असलेले विक्रांत व विशाल टकले यांना मजूर म्हणून कागदावर दाखवून अपहार केल्याची तक्रार दिली आहे.
खेड येथे 20 लाख 67 हजार 680 रुपयांचा अपहार झाल्याचे नमूद केले असून ही रक्कम सहायक गटविकास अधिकारी एस डी तायडे, सहायक लेखा अधिकारी आर जे लोध व क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर विश्वनाथ राऊत या तिघांत प्रत्येकी 6 लाख 89 हजार अशी विभागुन देत वसुलपात्र ठरविली आहे त्यातील काही रक्कम यांनी सरकारच्या बँक खात्यात भरली आहे.