मनाची नाही तर जनाची तरी लाज वाटू द्या
उस्मानाबादकर कदापी माफ करणार नाहीत
आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा महाविकास आघाडीवर घणाघात
काळ्या रंगाचा डीपी / स्टेटस ठेवून निषेध व्यक्त करण्याचे आवाहन
उस्मानाबाद – समय सारथी
महाविकास आघाडी सरकारने या कोरोना महामारीच्या अभूतपूर्व आपत्कालीन काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. मनाची नाही तर ३ आमदार व १ खासदार निवडून देणाऱ्या जनाची तरी लाज वाटू द्या. जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना खुला सवाल आहे की, तुम्ही सर्व मूग गिळून गप्प का ? असा सवाल आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कालच्या उपलब्ध आकडेवारी नुसार कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २९०७७ झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ५७९५ आहे. कालपर्यंत जिल्ह्यात ६९३ कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर राज्यांपेक्षा जास्त आहे. जिल्हाभरात २५०० च्या आत चाचण्या होऊन देखील ६५३ नवीन रुग्ण काल एका दिवसात सापडले, तर २० कोरोना बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत उस्मानाबादला अत्यंत कमी प्रमाणात रेमिडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. उमरगा, तुळजापूर, परांडा या उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी तर अनेक दिवसांपासून पुरवठाच होत नाही. जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथेही गरजेच्या ५०% पण पुरवठा होत नाही. जिल्हा रुग्णालय आवारातील ऑक्सीजन प्लांट काही महिन्यांपूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित असताना काल कसे बसे याचे काम पूर्ण झाले. जिल्हाभरात डॉक्टरांचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांना ऍडमिट करून घेण्यासाठी बेड शिल्लक नाहीत अशी आरोग्य यंत्रणेची बिकट अवस्था झालेली आहे. रुग्ण सापडल्यानंतर त्या परिसरात मायक्रो कंन्टेन्टमेन्ट झोन तयार करणे, संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग, टेस्टिंग आणि विलीगीकरण करणे व इतर अनुषंगिक गोष्टी समाधानकारक रीत्या होताना दिसत नाहीत.
अशा अभूतपूर्व परिस्थितीत राज्य सरकार व राज्य सरकारचा प्रतिनिधी असल्यामुळे पालकमंत्र्यांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे गरजेचे असते. २६ जानेवारी रोजी ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्री पुन्हा जिल्ह्यात येवु शकले नाहीत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली अभूतपूर्व व प्रचंड अशी आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री आजारातून बरे होईपर्यंत इतर मंत्री महोदय उस्मानाबाद जिल्ह्यासाठी प्राधिकृत करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती केली होती. २६ जानेवारी नंतर अद्याप जिल्ह्यात कोणतेही मंत्री आले नाहीत. इतर जिल्ह्यात पालकमंत्री दर आठवड्याला बैठका घेऊन जनतेच्या व प्रशासनाच्या अडचणी जाणून घेतात त्या सोडविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करतात. या आणीबाणीच्या काळात एकाही मंत्र्यांनी जिल्ह्यातील अडचणींबाबत येथे येऊन आढावा घेतलेला नाही. जिल्ह्यात शिवसेनेचे ३ आमदार व १ खासदार जनतेने निवडून दिलेले असताना शिवसेनेच्या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्यामुळे जनता वैतागलेली आहे. मनाची नाही तर ३ आमदार व १ खासदार निवडून देणाऱ्या जनाची तरी लाज वाटू द्या. या अक्षम्य दुर्लक्षा बाबत उस्मानाबादकर सत्ताधाऱ्यांना कदापी माफ करणार नाहीत. जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना तुम्ही सर्व मूग गिळून गप्प का? असा सवाल उपस्थित करत या कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वर व्हाट्सअँप वर काळ्या रंगाचा डीपी / स्टेटस ठेवून निषेध व्यक्त करावा असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.