‘विकास रत्न’ ते ‘नॉट रिचेबल’ – अनेक घोषणा हवेतच, ड्रग्ज व पवनचक्की माफियावर चुप्पी, शेतकऱ्यांवर अन्याय
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील भुम परंडा वाशी मतदार संघांचे आमदार तथा माजी आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत हे मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा असुन निवडून आल्यापासून ते एकदाही मतदार संघात फिरकले नाहीत. पावसाळी अधिवेशनात ही ते अनुपस्थितीत राहिल्याने त्यांच्यावर सर्वदुर टीका होत आहे. मतदार संघात व कार्यकर्ते यांच्यासाठी ते ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. त्यांच्या अधिवेशनातील अनुपस्थितीमागे आरोग्यविषयक कारणे असल्याचे सांगितले जात असुन ते डॉक्टरांचा सल्ला घेऊन अधिवेशनाच्या अंतीम आठवड्यात हजर होतील असे त्यांच्या कार्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रकाश धुमाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 30 जुनला सुरु झालेले 19 दिवसाचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैला संपणार आहे.
विधानसभा निकालापासुन आमदार सावंत हे धाराशिव जिल्ह्यात व भुम परंडा मतदार संघात फिरकले नाहीत. ‘विकास रत्न’ अशी ओळख असलेल्या आमदारांना आता ‘नॉट रिचेबल’ आमदार म्हणुन नवीन ओळख मतदारात मिळत आहे. मंत्री पद न मिळाल्याने ते पक्षश्रेष्टीवर नाराज असुन त्याचा राग मतदारावर काढत रुसले असल्याचा आरोप होतोय. गुढीपाडव्यापर्यंत पाणी आणणार, शेतकऱ्यांचे 55 कोटींचे वीज बील भैरवनाथ भरणार, धवल, उद्योग, हरीतक्रांती यासह अनेक आश्वासने तूर्तास हवेत विरगळली आहेत.
जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असुन पवनचक्की माफियाचा धुमाकूळ, शेतकऱ्यांना मारहाण, परंडा येथे मोठे ड्रग्ज रॅकेट उघड होऊनही या गंभीर सामाजिक विषयात सावंत यांनी एक चकार शब्द काढला नसुन भुमिका गुलदस्त्यात आहे. फोन उचलल्याने किंवा लोकांना भेटल्याने विकास होत नाही अशी त्यांची उघड भुमिका सर्वज्ञात आहे. आलो तर ‘पालकमंत्री’ म्हणुनच नाहीतर फिरकणार सुद्धा नाही या प्रणाचा प्रत्यय पुन्हा एकदा येत आहे. सावंत यांना 1,03,254 तर राहुल मोटे यांना 1,01,745 मते मिळून 1 हजार 509 मतांनी सावंत विजयी झाले.
सत्ता परिवर्तनासाठी एकनाथ शिंदे व फडणवीस यांच्यातील 150 गोपनीय बैठकाचा दावा व शिवसेना फोडून झालेल्या ‘बंडात’ त्यांचे योगदान होते त्याची ‘बक्षीसी’ म्हणून त्यांना ‘मंत्रीपद’ तर दुसऱ्याच मंत्रीमंडळ कॅबिनेट बैठकीत 17 नोव्हेंबरला स्वतंत्र जेएसपीएम विद्यापिठाचे ‘रिटर्न गिफ्ट’ देण्यात आले. मात्र आरोग्यमंत्री काळात झालेले आरोप, परभणी पालकमंत्री असतानाचा गोंधळ, बदल्यासह अन्य टेंडरमध्ये सुधारित ‘दर पत्रक’ यामुळे 2024 च्या मंत्रीमंडळात माजी आरोग्य मंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांना संधी दिली नसल्याचे बोलले जात आहे. जिल्हा नियोजन समिती असो की इतर नेत्यांचे दौरे, पक्ष मेळावे, राजकीय कार्यक्रम याला ते आले नाहीत. एकेकाळी सावलीसारखे सोबत असलेल्या काही पदाधिकारी यांनी सावंताकडे लाभाचे पालकमंत्री नसल्याने बॅनर व पक्ष कार्यक्रमात फोटो, नाव टाकणे टाळले आहे.
उद्योग धंदे याला संरक्षण म्हणुन त्यांना आमदारकी, मंत्रीपदाची गरज आहे म्हणुन त्यांनी निवडणुक लढवली. जनतेची कामे करताना वेळ व जमत नसेल तर राजीनामा द्या अशी मागणी माजी आमदार राहुल मोटे व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी केली आहे. यापुर्वीही 2019 ला निवडुन आल्यावर सावंत 3 वर्ष मतदार संघात फिरकले नव्हते. कार्यकर्ते यांना सुद्धा भेटत नाहीत, 1 लाख 5 हजार मतदारांनी विश्वास दाखवला ते त्याला पात्र ठरले नाहीत, एकही प्रश्न अधिवेशनात विचारला नाही. पवनचक्की माफियाचा धुमाकूळ असुन शेतकरी यांच्यावर अन्याय होत आहे, प्रश्न उपस्थितीत करणाऱ्या आमदाराची गरज आहे, राजीनामा देऊन खुशाल रहा असे पाटील म्हणाले.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला डॉ तानाजीराव सावंत यांना छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. डॉक्टर्सनी त्यांच्या पूर्वीच्या अँजिओप्लास्टीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून, पुणे ते मुंबई प्रवास करणे आरोग्यास धोकादायक असल्याचे सांगितले. अधिवेशन संदर्भात सावंत यांनी विधानसभा अध्यक्ष, सचिव, शिवसेना पक्षप्रमुख आणि प्रतोद यांना 30 जून रोजी लेखी पत्र देत अधिवेशन कालावधीतील अनुपस्थिती ग्राह्य धरण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, त्यांच्या अनुपस्थितीबाबत काही माध्यमांद्वारे चुकीची माहिती प्रसारित केल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आला आहे. “जानूनबुजून राजकीय हेतूने प्रेरित होऊन अशी चुकीची बातमी पसरवली जात आहे. डॉ तानाजीराव सावंत यांनी पालकमंत्री काळात धाराशिव जिल्ह्याला अभूतपूर्व निधी उपलब्ध करून दिला असून, मतदारसंघातील अनेक प्रश्न वेळेवर विधानभवनाच्या ऑनलाईन पोर्टलवर सादर केल्याचेही स्पष्टीकरण दिले जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 24 रोजी लागल्यानंतर 5 डिसेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानात मुख्यमंत्री म्हणुन देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. 7 व 8 डिसेंबर रोजी 288 आमदारांनी विधीमंडळात आमदारकीची शपथ घेतली. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी नागपूर येथे राजभवनात 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्री असे 39 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, त्यात शिवसेना शिंदे गटाचे 11 कॅबिनेट व 2 राज्यमंत्री होते. भाजप 16 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री असे 19 तर राष्ट्रवादी अजित पवार गट 8 कॅबिनेट व 1 राज्यमंत्री असे 9 जणांनी शपथ घेतली.