मंकावती तीर्थकुंडाचे प्रवेशद्वार खुले करण्याचे उपविभागीय अधिकारी यांचे आदेश
उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तीर्थकुंड याचे प्रवेशद्वार खुले करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त डॉ योगेश खरमाटे यांनी दिले आहेत. तुळजापूर तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांना लेखी आदेश दिले आहेत. मंकावती तिर्थकुंडच्या मालकी हक्कातील देवानंद रोचकरी यांचे नाव कमी करून त्या जागेवर नगर परिषदेचे नाव लागले आहे.
तुळजापूर येथील महंत मावजीनाथ गुरू तुकनाथ महाराज गरीबनाथ मठाचे महंत रूढी परंपरेनुसार वर्षातून एक दिवस कार्तिकी अमावास्येला म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी तुळजाभवानी मंदिरात तुळजाभवानी दर्शनासाठी जातात त्यापूर्वी ते मंकावती तीर्थकुंडात स्नान करून त्यातील पवित्र जल मंदिरामध्ये पूजेसाठी घेऊन जातात मात्र मागील वर्षापासून मंकावती तीर्थकुंड भागात देवानंद रोचकरी यांनी अतिक्रमण करून प्रवेशद्वार कुलुप बंद केल्याची तक्रार महंत मावजिनाथ गुरु तुकनाथ महाराज गरीबनाथ मठ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी डॉ खरमाटे यांनी मंकावती तीर्थ कुंडाचे प्रवेशद्वार खुले करून महंत व इतर भक्तांना मंकावती तीर्थकुंड दर्शनासाठी खुले करावे असे आदेश दिले आहेत तसेच हे अतिक्रमण व तीर्थकुंड खुले करत असताना कायदा व सुव्यवस्थेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या व यासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी व त्यांना सादर करावा असे आदेशित केले आहे.