भ्रष्टाचाराचा कळस – कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी 5 हजारांची लाच
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर पालिकेचा कर्मचारी निलंबीत
तुळजापूर – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना संकट काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे . मृत कोरोनाबाधीत रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी एका कर्मचाऱ्याने 5 हजारांची लाच घेऊन या जागतिक संकटात भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे हे खरच दुर्दैवी म्हणावे लागेल.एकीकडे संपूर्ण यंत्रणा लोक कोरोनाशी लढा देत असताना काही मंडळी मात्र या संकटाचा व रुग्णांच्या मजबुरीचा आर्थिक फायदा घेत आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर नगर परिषदेतील ही घटना असून बामणी या गावातील एका मयत रुग्णाच्या नातेवाईककडून अंत्यसंस्कार लवकर करण्यासाठी तुळजापूर नगर परिषदेचे कर्मचारी शंकर कांबळे यांनी 5 हजार रुपयांची लाच घेतली. या घटनेची माहिती कळताच व नातेवाईक यांच्याकडून खातरजमा केल्यानंतर तुळजापूर मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी तात्काळ कांबळे याना निलंबन करण्याचे आदेश दिले असून त्यांना निलंबित केले आहे. शुक्रवारी तुळजापूर येथे 13 मृत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तुळजापूर नगर परिषद ही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना या प्रभावीपणे राबवित असुन कांबळे यांनी केलेला प्रकार दुर्दैवी आहे.
कोरोना संकटात काळजी घ्या
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे विनाकारण लोकांनी बाहेर फिरू नये तसेच कोरोना नियमांचे पालन करावे. कोरोनाची कोणतीही लक्षणे असल्यावर ती अंगावर न काढता तात्काळ रुग्णालयात जाणे गरजेचे आहे आहे असे आवाहन सतत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर करत आहेत. कोरोनाची कोणतीही लक्षणे अंगावर न काढता वेळीच तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे जेणेकरून मृत्यू टाळता येऊ शकतो , नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.