भ्रष्टाचारच्या तायडे पॅटर्नला राज मान्यता ? – पैसे भरल्याने गुन्ह्याची साखळी पुर्ण
अपर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या भूमिकेविरोधात राज्यपाल यांच्याकडे तक्रार
शोष खड्ड्यात अडकणार कोण ? गुन्हा नोंद न करण्याचे आदेश येणार अंगलट ?
तायडे यांच्या कारनाम्याचे अनेक किस्से उघड, विभागीय चौकशीची आवश्यक
अपहार मान्य करत लाखो रुपये भरले, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
उस्मानाबाद – समय सारथी
राज्याच्या रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार हे आता त्यांच्या एका भुमिकेमुळे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. उस्मानाबाद पंचायत समितीच्या शोषखड्डेच्या 1 कोटी 12 लाख रुपयांच्या प्रकरणात रोहयो अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी अपील निर्णय होईपर्यंत कोणावरही फौजदारी गुन्हे नोंद करू नये असे अजब आदेश दिले आहेत.आता हेच आदेश अंगलट येणार असल्याचे दिसते. भ्रष्टाचारच्या शोष खड्ड्यात अडकणार कोण ? याची चर्चा यनिमित्ताने होत आहे. भ्रष्टाचाराच्या तायडे पॅटर्नला एक प्रकारे राजमान्यात देण्यात आली आहे. तायडे यांच्या कारनाम्याचे अनेक किस्से उघड होत असून तायडे यांनी या प्रकरणात खेड येथे स्वतः चौकशी केली आता तेच यात अडकले आहेत.
फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे कोणत्याही प्रकारचे उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाचे मुळ लेखी आदेश नसताना केवळ अपहारातील सहभागी तायडे यांच्या एका चार ओळीच्या पत्रावरून सचिव नंदकुमार यांनी स्वर्ग गाठत भ्रष्टाचारात थेट सहभागी व संभाव्य लोकांवर गुन्हा नोंद करू नये असे आदेश दिले आहेत, सध्या या साक्षात्काराची मोठी चर्चा होत आहे. पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर की दबाव ? यावर चर्चा होत असतानाच सचिवाच्या आदेशासह हे प्रकरण लवकरच उच्च न्यायालयात जाणार आहे. घोटाळेबाज उजळ माथ्याने फिरत असताना प्रशासनातील अधिकाऱ्यांची हतबलता जाणवत आहे.
एखाद्या प्रकरणात आर्थिक अपहार झाल्यानंतर त्या आरोप विरोधात अपील केल्यावर सुनावणी घेणे कायद्यानुसार क्रमप्राप्त आहे मात्र दरम्यान फौजदारी गुन्हेच नोंद करू नका अश्या स्वरूपाचे आदेश जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देणे कितपत योग्य आहे ? निष्पक्ष चौकशीला अडसर कोणाला आहे ? याबाबत राज्यपाल यांना केलेल्या तक्रारीत आक्षेप घेण्यात आला असून अनेक प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.
दरम्यान या योजनेचे सहायक कार्यक्रम अधिकारी यांची नियंत्रणाची भुमिका महत्वाची आहे मात्र त्यांना पद्धतशीरपणे दूर ठेवले जात आहे. लाखो रुपये परस्पर खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. शोषखड्डे काम करताना खेड गावासह अन्य ठिकाणी चक्क मयत लोकांची नावे कामावर मजूर म्हणून दाखविण्यात आली आहेत, याप्रकरणी तक्रार निवारण प्राधिकरण यांच्याकडे स्वतंत्र चौकशी सुरु आहे.
घोटाळा उघड झाल्यावर सुरेश तायडे यांच्यासह सहायक लेखा अधिकारी आर जे लोध व क्लार्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर विश्वनाथ राऊत यांनी लाखो रुपये भरले आहेत ही रक्कम भरून त्यांनी एकप्रकारे अपहार केल्याचे मान्य केले आहे. 12 हजार रुपयांचे मानधन असलेल्या राऊत यांनी एका झटक्यात तब्बल 25 लाख रुपये अपहारीत रक्कम बँकेतुन सरकार खाती भरली आहे, विशेष म्हणजे त्याची सेवा समाप्तीची शिफारस केली असताना 25 लाख भरले आहेत. तिघांनी भरलेल्या इतकी मोठी रक्कमेबाबत लाच लुचपत विभाग व आयकर विभागाच्या चौकशीची गरज आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील 5 गावातील 232 शोषखड्डयात बोगस मजुराच्या नोंदी घेऊन तब्बल 1 कोटी 12 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीत सिद्ध झाले असून यात पंचायत समितीमधील 3 अधिकारी दोषी सापडले आहेत. त्याचा अपीलाचा निर्णय लागेपर्यंत या 3 जणांसह गटविकास अधिकारी, ग्रामरोजगार सेवक, ग्रामसेवक, पालक तांत्रिक अधिकारी, गावचे डाटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारची फौजदारी कारवाई करू नये असे आदेश नंदकुमार यांनी दिले आहेत, हे आदेश आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
घोटाळा करण्याचा व पचवण्याचा हा तायडे पॅटर्न उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी घातक आहे .या घोटाळ्यावर लोकप्रतिनिधी गप्प आहेत.
मातोश्री पानंद रस्ते योजना, भ्रष्टाचाराचा महामार्ग
रस्ते तयार करून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून असलेल्या मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना‘ मध्ये सुद्धा अनेक तक्रारी असून याची चौकशी करण्याची गरज आहे. ही योजना घोटाळेबाजासाठी भ्रष्टाचाराचा महामार्ग बनली आहे.