भुखंड घोटाळा – कळंब बाजार समितीच्या तत्कालीन 70 संचालकांना कारणे दाखवा नोटीसा
पंधरा दिवसात खुलासा न केल्यास कायदेशीर कारवाई – जिल्हा उपनिबंधकांचा इशारा
3 चौकशी अहवाल तरी फौजदारी गुन्हे नोंद करण्यास टाळाटाळ ? अभय कोणाचे ?
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास अडीचशे कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बाजार समितीच्या भूखंडाचे वाटप करताना नियमांचे उल्लंघन केले असुन मनमानी पद्धतीने वाटप केले तर अनेक ठिकाणी अतिक्रमण केले आहे.
कळंब बाजार समितीच्या तथाकथित भूखंड घोटाळ्यात तत्कालीन सभापती,उपसभापती, सचिव, प्रशासक, संचालक अश्या 70 जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या सर्वांनी त्यांच्यावर सोपावलेली कर्तव्य पार पाडण्यासाठी हेतूत दुराग्रहाने कसूर केल्याचे स्पष्ट होत असल्याने कारवाईचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आजवर 3 वेगवेगळे चौकशी अहवाल आले असुन त्यात फौजदारी कारवाईची शिफारस केली असली तरी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली जात आहे त्यामुळे यादवी माजली असुन याला अभय कोणाचे ? हा प्रश्न चर्चीला जात आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती ही सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखली जाते. या बाजार समितीच्या मालकीची सात एकर 38 कुंठे एवढी जमीन आहे .या जमिनीचे 600 प्लॉट करून विकण्यात आले आहेत. हे प्लॉट विकताना तत्कालीन संचालक मंडळ ,प्रशासक अधिकारी यांनी सर्व नियम धाब्यावर बसून कोणतीही अनामत रक्कम न घेता हे प्लॉट खिरापतीसारखे वाटले आहेत. कहर म्हणजे पणन संचालकाने बनवलेल्या लेआउट मध्ये छेडछाड करून ओपन पेस व रस्ता या जागेवरही प्लॉट तयार करण्यात आले व कोणताही ठराव न घेता किंवा पणन संचालकाची परवानगी न घेता हे प्लॉट विनामूल्य वाटप करण्यात आले. लेआउटमध्ये सोईनुसार बदल करून प्लॉट विक्री केली आहे तर ओपन पेस व रस्त्याची जागाही प्लॉट म्हणून विकली आहे.
बाजार समितीच्या जागेवर कृषी संबंधित दुकाने, गुरांचा बाजार ,शेतकऱ्यांसाठी निवास व्यवस्था, भुसार बाजार यासाठी बाजार समितीचे प्लॉट देणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र संचालक मंडळांनी पणन संचालकाची कोणतीही परवानगी न घेता सर्व नियम धाब्यावर बसवून परस्पर इतरांना विकले, भाडेपट्टावरील प्लॉट सुद्धा थेट विक्री केले. माजी सैनिक निवृत्ती हुलुळे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून तत्कालीन सहनिबंधक बालाजी कटकधोंड यांनी या प्रकरणाची चौकशी केली व आपला अहवाल सरकारकडे सादर केला या अहवालावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही.
शिरापूरकर यांनी प्रकरण घेतले फैलावर, दाखविले धाडस
नोटिसीला पंधरा दिवसाच्या आत उत्तर न दिल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा धाराशिव जिल्हा उप निबंधक सुनील शिरापूरकर यांनी नोटीसीद्वारे दिला आहे. यामुळे कळंब बाजार समिती मधील तत्कालीन संचालक मंडळ, प्रशासक व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे कधी दाखल होणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. खुलासा न दिल्यास महाराष्ट्र कृषी खरेदी व विक्री अधिनियम 1963 मधील तरतुदीनुसार कारवाईचा इशारा शिरापुरकर यांनी दिला आहे. हे प्रकरण शिरापुरकर यांनी गांभीर्याने घेतले असुन ठोस कारवाईचे धाडस दाखविले आहे.