भाजप सरकारने शेतकर्यांचा अंत बघु नये, तात्काळ मदत द्यावी
आमदार कैलास पाटील आक्रमक – कोल्हापूरच्या धर्तीवर मदत व पीक कर्ज माफ करा
उस्मानाबाद – समय सारथी
चालु खरीप हंगामात गोगलगाय व सततच्या पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पीक उध्वस्त झाले, त्यात यलो मोझॅक(हळद्या) या नव्या रोगाने राहिलेल पिकही बाधित झाले आहे. शेतकर्यांना आता फक्त सरकारवर आशा आहे,त्यामुळे भाजप सरकारने अजुन शेतकर्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहु नये अशी भावना आमदार कैलास घाडगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापुर सांगली भागात ज्या पध्दतीने मदत दिली त्याच धर्तीवर जिल्ह्यातील शेतकर्यांनाही मदतीची अपेक्षा असल्याचे मत आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केले आहे.
कोल्हापुर व सांगलीमध्ये ज्या पध्दतीन दोन वर्षाचे पिक कर्ज माफ केले शिवाय एसडीआरएफ चे निकष बाजुला ठेवुन मदत करण्यात आली,त्याचप्रमाणे आताही तशीच मदत मिळणे आवश्यक आहे अशी मागणी आमदार घाडगे पाटील यांनी भाजपच्या सरकारकडे केली आहे.
मागील काही दिवसापासून संततधार पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे जमिनीतच खराब झाले व ते उगवलेच नाही.शेतकऱ्याना दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती.तेव्हा झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची आवश्यकता होती. कृषी व महसूल विभागाला शासनाकडून आदेश आले नसल्याने त्यानी वेळेत पंचनामे देखील केले नाहीत, एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही राज्य शासनाकडून पंचनामे करण्याचे कुठलेही आदेश दिले नव्हते.ज्या शेतकर्यांचे नुकसान झाले त्यांना मदत देण्याची प्रक्रीयाच सरकारने थांबवली हे संतापजनक असल्याचे आमदार घाडगे पाटील यांनी म्हटले आहे. त्यानंतर झोपलेल्या सरकारला जाग आणावी लागली व पंचनामे करण्याचे आदेश आले, तोपर्यंत नुकसानीचं प्रमाण वाढत गेले होतं.
अगदी प्रारंभी पेरणी झाल्यानंतर उगवून आलेले सोयाबीन गोगलगायी व इतर किडीमुळे वाया गेले.तसेच पेरणी केल्यानंतर पावसाने खराब होऊन न उगवलेल्या पिकाच्या नुकसानीची कसलीही मदत पिकविमा योजनेत मिळत नाही. त्यात आता अतिवृष्टीच्या संकटाने तर शेतकर्यांचे संपुर्ण पिकच वाहुन गेले आहे. राहिलेल्या पिकावर यलो मोझॅक (हळद्या) या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने संपुर्ण पिकच वाया जाणार आहे. अशी अभुतपुर्व नुकसानकारक परिस्थिती आली असताना किमान याबाबत तरी सहानुभूतिनं विचार करण्याची गरज असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटल आहे.
शेतकर्यांनी पिक कर्ज घेऊन हा खर्च केलेला आहे त्यात गेल्या दोन वर्षातही नुकसान होऊनही पिक विमा मिळाला नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. अशावेळी शेतकर्यांचे मागील दोन वर्षाचे व चालु वर्षाचे पिक कर्ज माफ करणे आवश्यक आहे अन्यथा पुन्हा कर्जबाजारीपणामुळे या जिल्ह्यात आत्महत्येचे प्रकार होण्याचा धोका निर्माण होण्याची भिती आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली आहे.
कोल्हापुर व सांगली या जिल्ह्यात अशाप्रकारची मदत करण्यात आली होती,तिथे कोरडवाहु पिकांस २० हजार ४००, सिंचनाखाली पिकांस ४० हजार ५०० व बहुवार्षिक पिकांस ५४ हजार रुपये मदत केलेली होती.तशीच परिस्थिती आता जिल्ह्यात उद्भवली आहे. शेतकर्यांचे पिक कर्ज माफ करुन पंचनाम्याचा अडसरही न पाळता थेट मदतीचा हात मिळावा अशी अपेक्षा आमदार घाडगे पाटील यांनी व्यक्त केली आहे.