लोहारा – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात उमरगा येथील माकणी जिल्हा परिषद जागेवरून शिवसेना भाजप महायुतीत वादाची ठिणगी पडली असुन या ठिकाणी भाजपचा दारुण पराभव करा असे आवाहन पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जेवळी येथील प्रचार सभेत केले. भाजपने गद्दारी केली त्यांना धडा शिकवा असे गायकवाड म्हणाले तर माकणीची जागा ही फक्त आणि फक्त शिवसेनेची आहे, तिथे शिवसेना दिसली पाहिजेत, तिथे मोठ्या मतांनी विजयी करा असे पालकमंत्री सरनाईक म्हणाले.
धाराशिव येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा झाली या प्रचार सभेत शिवसेना नेत्यांनी एका जागेवर भाजपाच्या दुटप्पी भुमिकेवर टीका करीत धडा शिकवावा असे आवाहन केले. यावेळी व्यासपिठावर संपर्कप्रमुख राजन साळवी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादीचे सुरेश बिराजदार, नगराध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हा प्रमुख मोहन पनूरे, सुरज साळुंके, नितीन लांडगे, ऍड योगेश केदार, आनंद पाटील उपस्थितीत होते.
उमरगा लोहारा येथे भाजप शिवसेना राष्ट्रवादी अशी महायुती झाली असल्याचे रवींद्र गायकवाड म्हणाले. महायुती असतानाही माकणी येथे भाजपने उमेदवार दिला आहे, त्यांनी गद्दारी केली आहे त्यांना धडा शिकवा असे आवाहन गायकवाड यांनी केले. तिथे नातेवाईक, कार्यकर्ते यांची भेट घेऊन जास्तीत जास्त मते गोळा करा व भाजपला पराभूत करा असे आवाहन गायकवाड यांनी केले.
पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक म्हणाले की, ठाणे मुंबई पासुन इतक्या लांब मला इथला विकासासाठी करण्यासाठी नेमले. करोडो रुपयांची विकास कामे होत असुन येत्या 5 वर्षात अनेक कामे होतील. लाडक्या बहिणींना आर्थिक आधार देण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला. धाराशिव जिल्ह्यात महायुतीचा विजय होऊन भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केला. माकणीची जागा ही फक्त आणि फक्त शिवसेनेची आहे, तिथे सगळीकडे शिवसेना दिसली पाहिजेत,असे म्हणत मोठ्या मतांनी विजयी करा असे आवाहन पालकमंत्री सरनाईक यांनी केले.
शिवसेना भाजपा अधिकृत उमेदवार यांना मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. काही बंडखोर लोक येतील व सांगितील, पालकमंत्री यांचा पाठिंबा आहे, बंडखोरांना मते देऊ नका, विकासासाठी पैसे निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले. नगर परिषदमध्ये भगवा फडकवाला, नगर विकास खाते माझ्याकडे आहे मी निधी देतो, दिलेला शब्द पुर्ण केला जाईल. एकदा शब्द दिला की तो पुर्ण केला जाईल असे शिंदे म्हणाले











