भंगार चोरीत तत्कालीन मुख्याधिकारी यलगट्टे यांना जामीन – अट्रॉसिटी गुन्ह्यात उद्या अटक होणार
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेत झालेल्या लाखो रुपयांच्या भंगारचोरीत तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांना कोर्टाने जामीन मंजुर केला आहे त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. कोर्टाने यलगट्टे यांना 10 एप्रिल पर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर त्यांना सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले त्यानंतर त्यांना जामीन मंजुर केला आहे मात्र यलगट्टे यांनी जामिनीच्या अटी पुर्ण न केल्याने त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. त्यांना अट्रॉसिटी प्रकरणात ताबा द्यावा अशी मागणी पोलिसांनी केल्याने त्यांना उद्या मंगळवारी अट्रॉसिटी गुन्ह्यात अटक होऊ शकते.
भंगार चोरी प्रकरण यलगट्टे यांना चांगलेच अंगलट आले होते. भंगारचोरी प्रकरणात आम आदमी पार्टीचे ऍड अजित खोत यांनी या प्रकरणात लेखी तक्रार देत जबाब दिला आहे ज्यात भंगारचोरी ही 85 लाखांची असल्याचे नमूद केले आहे तर विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी यात तक्रार देत तारांकित प्रश्न उपस्थितीत केले होते. लाखोंची भंगारचोरी अनं यलगट्टे यांची हेराफेरी या मथळ्याखाली दैनिक समय सारथी वृत्तपत्राने भंगारचोरीचे प्रकरण उघड केले होते.