भंगार घोटाळा प्रकरणी गुन्हा नोंद करणाऱ्याचे मुख्याधिकारी यलगट्टे यांचे आदेश – नगर परिषदेच्या आवरातून साहित्य चोरी
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद नगर परिषदेच्या आवरातून भंगार व इतर साहित्य चोरी केल्याच्या प्रकरणी तात्काळ आजच गुन्हे नोंद करण्याचे लेखी आदेश मुख्याधिकारी तथा प्रशासक हरीकल्याण यलगट्टे यांनी दिले आहेत. नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक सुनील कांबळे यांना गुन्हा नोंद करण्यासाठी प्राधिकृत केले आहे, गुन्हा नोंदणी करुन त्याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.दैनिक समय सारथीने हे प्रकरण समोर आणले होते त्यानंतर मुख्याधिकारी यांनी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.
नगर परिषदेचे निरूपयोगी साहित्य व अतिक्रमण हटाव पथकाकडून जप्त करण्यात आलेले साहित्य नगर परिषदेच्या आवारात ठेवले होते मात्र ते संगनमताने चोरी करण्यात आले. या चोरी प्रकरणात कर्मचारी विलास गोरे, नगर परिषदमध्ये काम करणारा ठेकेदार व भंगार खरेदी करणार यांच्या विरोधात आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करणाऱ्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी दिले आहेत.विशेष म्हणजे लाखोंचे साहित्य व भंगार चोरल्यानंतर संबंधित भंगार खरेदी करणार याने नगर परिषदेच्या खात्यात 25 हजाराची नाममात्र तुटपुंजी रक्कम जमा केल्याची माहिती आहे, ही रक्कम भरून हे प्रकरण दडपण्याचा डाव होता मात्र तो आता हाणून पडला आहे.
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विनापरवाना खासगी वाहनातून लाखो रुपयांचे भंगार चोरून विकण्यात आले असून हा सर्व प्रकार नगर परिषदेच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. नगर परिषद अतिक्रमण हटाव पथकाकडून जप्त करण्यात आलेले साहित्य नगर परिषद कार्यालयात आणले होते मात्र हे साहित्य 23 जुलै व 24 जुलै 2022 रोजी शनिवार व रविवार या सार्वजनिक सुट्टयाच्या दिवशी खासगी वाहनात भरून विक्री केल्याची तक्रार मुख्याधिकारी यांच्याकडे आली होती. तसेच या प्रकरणात प्राथमिक तपासणीमध्ये नगर परिषद कर्मचारी विलास गोरे व नगर परिषदमध्ये काम करणारा एक ठेकेदार सामील असल्याचे समोर आले आहे असे पत्रात नमूद केले आहे.
या प्रकरणात सर्व वाहनचालक, घंटा गाडी चालक, सुट्टीच्या दिवशी कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी तसेच नगर परिषद कार्यालय आवारात असलेले सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याची पडताळणी करुन सदरचे साहित्य किती होते व त्याची किमंत काय होती आणि या प्रकरणामध्ये कोणकोणत्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता याबाबत सखोल चौकशी करुन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्याधिकारी यलगट्टे यांनी दिले होते त्यानंतर आता गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत.
=======
*कोरोना काळात कंटेनमेंट झोन प्रकरण – बोगस बिले सादर करुन लाखो रुपये लाटल्याची तक्रार*
*कागदोपत्री ताळमेळ, उस्मानाबाद शहरात 80 लाखांचे बॅरीगेटींग ?*
https://www.samaysarathi.com/2022/08/blog-post.html?m=1