बोगस नौकर भरती – सेवा समाप्तीची प्रक्रिया सुरु करण्याचे जिल्हाधिकारी डॉ ओम्बासेंचे आदेश
तुळजापूर व धाराशिव येथील 9 जण ठरले अपात्र – आमदार सुरेश धसांच्या तक्रारीनंतर कारवाई
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर व धाराशिव नगर परिषदेतील बोगस नौकर भरती प्रकरणी आता कारवाईला वेग आला असुन तुळजापूर नगर परिषदेच्या 7 तर धाराशिव नगर परिषदेतील 2 कर्मचारी यांची सेवा समाप्तीची प्रक्रिया सुरु करावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी धाराशिव मुख्याधिकारी वसुधा फड व तुळजापूर मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांना दिले आहेत. विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी या बोगस नौकर भरतीचा भांडाफोड करीत तक्रार दाखल केली होती त्यानंतर ही कारवाई सुरु आहे.
धाराशिव व तुळजापूर या दोन्ही ठिकाणची नौकर भरती तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांनी केल्याने त्यांची विभागीय चौकशी जिल्हाधिकारी यांनी प्रस्तावित केली आहे तसेच पुढील कायदेशीर कारवाईबाबत जिल्हाधिकारी यांनी नगर परिषद संचनालय यांना पत्र दिले आहे. नौकर भरती करताना ज्या विभाग प्रमुखांनी अहवाल सादर केला तेही अडचणीत सापडले असुन त्यांवर सुद्धा कारवाई प्रस्तावित केली आहे. या सर्वांची नावे उद्या समोर येतील.
आमदार सुरेश धस यांच्या तक्रारीनंतर गठीत चौकशी समितीच्या अहवालात ही 9 पदे नियमबाह्य भरल्याचे समोर आले होते. या नौकरभरतीत आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. बोगस नौकर भरतीत काही स्थानिक गावपुढारी अग्रभागी होते मात्र ते आता चांगलेच तोंडावर पडले आहेत.
तुळजापूर नगर परिषद येथे 2 पदे भरता येत असताना 9 पदे भरली गेली त्यामुळे 7 जणांची नेमणूक चुकीच्या पद्धतीने करण्यात आली तर धाराशिव नगर परिषदेत 1 पद भरता येत असताना 3 पदे भरली गेली आता त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.
नौकर भरती करताना नियमांचे उल्लंघन झाले असुन शैक्षणिक अहर्ता नसताना नौकर भरती केल्याचा ठपका त्रीसदस्य समितीने चौकशी अहवालात ठेवला
आहे. नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चौकशी समितीने अहवाल सादर केला आहे.
तुळजापूर येथे 9 तर धाराशिव येथे 3 अशी 12 पदे भरली गेली आहेत त्यापैकी 9 जणांची सेवा समाप्त होणार आहे. या घोटाळ्याने यलगट्टे यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. 2 दिवसापुर्वी यलगट्टे यांचे पदावनत (डिमोशन) करण्यात आले असुन त्यांना मुख्याधिकारी गट अ संवर्गातून मुख्याधिकारी गट ब संवर्गात पदावनत करण्यात आले आहे.
तुळजापूर व धाराशिव नगर परिषदेत नौकर भरती अनुकंपा भरतीमध्ये सरळ सेवेचे 20 टक्के पदे भरण्याची मर्यादा असताना उल्लंघन करुन 50 टक्के पदे भरण्यात आली तर मंजुर आकृतीबंधामध्ये नमूद असलेल्या शैक्षणिक अहर्ताचे पालन केले नसल्याचा ठपका ठेवला आहे.