बोगस गुंठेवारीच्या चौकशीचे आदेश – आमदार सुरेश धस यांच्या तक्रारीवर जिल्हाधिकारी ओम्बासे यांचे आदेश
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेत खुल्या जागेवरील प्लॉट व इतर प्लॉटच्या बोगस गुंठेवारी केल्याची लेखी तक्रार आमदार सुरेश धस यांनी केली असुन या बोगस गुंठेवारी प्रकरणाची 15 दिवसात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. नगर परिषदेचे जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी ही चौकशी मुख्याधिकारी व नगर रचनाकार यांच्या मार्फत करण्याचे आदेश दिले आहेत.
धाराशिव नगर परिषदेत खुल्या प्लॉटवर तसेच इतर जमिनीची बोगस गुंठेवारी केली आहे. काही प्रकरणात मंजुरी देताना सेवानिवृत्त नगर अभियंता यांची स्वाक्षरी घेऊन मान्यता दिली आहे. अनेक ठिकाणी लिपिकाच्या सहीने आदेश काढले आहेत. गुंठेवारीच्या अनेक संचिका गहाळ होऊनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असुन संबंधिताना सह आरोपी करावे. या प्रकरणात तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे, नगर अभियंता, लिपीक यांची चौकशी करावी अशी तक्रार देत चौकशी समिती नेमावी अशी मागणी धस यांनी केली होती. त्यावर चौकशी समिती जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी नेमली असुन त्याचा अहवाल 15 दिवसात सादर करण्यास सांगितले आहे.