बिहार म्हणता तर तुम्ही वाळवंट केलात – माजी आमदार राहुल मोटेवर सुरेश कांबळेचे आरोप
तो मी नव्हेच – मी अराजकीय समाजसेवक, पवनचक्की माफिया नाही उलट रक्षणकर्ता
विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या दबावामुळे खोटे गुन्हे दाखल – मंत्री सावंतांच्या विकासाचा धसका
धाराशिव – समय सारथी
जे परंडा मतदारसंघाचा बिहार झाला आहे असे म्हणतात त्यांनीच या मतदार संघाचा वाळवंट केला आहे. 25 वर्ष सत्ता असताना विकास केला नाही, माजी आमदार राहुल मोटे यांना विकासाचे, जनतेचे काही देणे घेणे नाही. कोणत्याही परिस्थितीत स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणे एवढेच त्यांचे काम आहे त्यासाठी ते कोणाचाही बळी देऊ शकतात. त्यांना कोणाची प्रगती झालेली सहन होत नाही. लोकांचे अस्तित्व संपवण्याच्या नादात त्यांचे अस्तित्व कधी संपले हे त्यांनाच कळाले नाही असा आरोप सुरेश कांबळे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या धाराशिव येथील पत्रकार परिषदेतील आरोपांना उत्तर देताना भुम येथे आयोजित पत्रकार परिषदेत कांबळे यांनी आरोप केले. आमदार मोटे यांनी भुम परंडा भागात पवनचक्की माफिया वाढल्याच्या व गुंडटोळ्यांची दहशत असल्याचा आरोप केला होता.
परंडा बाजार समिती मतदार संघात महाविकास आघाडीच्या संचालकांचे अपहरण केल्या प्रकरणी सुरेश कांबळे यांच्यावर गुन्हा नोंद होऊन अटक झाली मात्र तो मी नव्हेच अशी भुमिका कांबळे यांनी घेत गुन्हा नोंद होईपर्यंत काही माहिती नव्हते, माझा त्या निवडणूक व घटनेशी संबंध नाही असे सांगितले. परंडा येथील जाकीर सौदागर, नवनाथ जगताप यांना सुद्धा या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न होता मात्र तो असफल झाला. गुन्ह्यात सत्यता नसताना केवळ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या माध्यमातून दबाव टाकून माझ्यावर खोटे गुन्हे राहुल मोटे यांनी दाखल केले असा आरोप सुरेश कांबळे यांनी केला. मी त्यांना नेले असते तर मतदानाला आणले असते किंवा मंत्री सावंत यांनी उमेदवार उभा केला असता.
भूम शहरातही मधल्या काळात मारहाण झाली, त्याबाबत माजी आमदार काही बोलत नाहीत, ते फक्त मलाच टार्गेट करतात.परंडा तालुक्यातही शिवसेनेच्या तालुका प्रमुखास मारहाण करण्यात आली त्याबाबत हे एक शब्दही बोलत नाहीत आणि हे परंडा मतदारसंघाचा बिहार केला आहे असे म्हणतात त्यामुळे मोटे यांनी अगोदर स्वतःचे आत्मपरीक्षण करावे व नंतर आरोप करावेत ते त्यांच्या नातेवाइकांबद्दल चकार शब्दही काढत नाहीत असे कांबळे म्हणाले.
मी ओबीसी अल्पसंख्याक समाजाचा असल्यानेच हा प्रकार घडत आहे.मी कायम लोकांच्या संपर्कात आहे, माझा जास्तीत जास्त वेळ मी समाजसेवेची कामे करतो. लोकांची सेवा करतो आणि जो काम करतो तो यांना वाईटच वाटणारच आहे. वाशी पोलीस ठाण्यातही पोलिसांवर दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात एकच पवनचक्की कार्यरत होती त्यामुळे ती कंपनी शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करत होती याउलट मी आणखी दोन कंपन्या येथे आणल्या त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा झाला.
पालकमंत्री सावंत यांनी हरीतक्रांती करीत जो विकास करत आहेत त्यामुळे मोटे हे अस्थिर झाले आहेत त्यांना माहित आहे या विकास कामांमुळे राजकीय आखाडयात ते मतदारांच्या पाठिंब्याने पालकमंत्री सावंत हे कायम विजयी राहणार आहेत असा विश्वास व्यक्त केला.
मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी मला व पवनचक्की कंपनी यांना एकदा बोलावून घेतले व समोरासमोर चर्चा केली व विचारले कोण कोण त्रास देतोय तेव्हा त्यांनी इतर नावे सांगितली मात्र मी त्रास देत नसल्याचे सांगितले उलट मी त्यांना जे त्रास देतात त्यापासुन कंपनीवाल्याना संरक्षण देत मदत करतात असे सांगितले. बाहेरच्या लोकांनी हे काम करण्यापेक्षा मी करतोय त्यात चुक काय ? मी काम करुन चार पैसे कमवतोय. खोटे गुन्हे दाखल करायचे व बिहार झाला असे म्हणतात.
जनतेची कामे करताना मला गुंड म्हणू द्या त्याचे वाईट वाटत नाही. मी पुणे येथे हमाली काम करुन कष्ट करुन मोठा झालो आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले की षंड होऊन जगण्यापेक्षा गुड होऊन जगा त्यामुळे मला फरक पडत नाही. आम्ही सर्व याचं भागातले मग तिथे जगायला गेलो आम्ही संत नाहीत पण कोणाचे खिशे मारले नाहीत मग पुण्याचे गुंड कोन असा पलट सवाल त्यांनी केला. मी कोणत्याही पवनचक्की कंपनीकडुन पैसे घेत नाही,मी त्यांना त्रास दिलेला एक माणूस किंवा शेतकरी समोर आणा. मी त्यांना कामे मागतो व करतोय. पूर्वी एक कंपनी होती आता मी 4 कंपन्या आणल्या त्यामुळे या भागात शेतकऱ्यांना चार पैसे जास्तीचे मिळाले.
पवनचक्की माफिया म्हणू द्या किंवा आणखी काही म्हणू द्या. माझी सामाजिक चळवळ कायम चालू राहील.मी सर्वसामान्यांच्या कामासाठी कधीही उपलब्ध असणार आहे. मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. मी जय हनुमान ग्रुपच्या माध्यमातू काम करतो आहे.मी माझा कार्यकर्ता आणि सर्वसामान्यांच्या कामासाठी कोणाकडेही जातो. परंडा बाजार समितीत जे निवडून आले त्यांचा मी सत्कार केला त्यांचे अजुन माझे स्नेहाचे संबंध आहेत.मी राहुल मोटे यांच्याकडे येत नाही म्हणून त्यांनी मला खोट्या गुन्ह्यात गुंतवले आहे.
स्थानिक स्वराज संस्थेत मला डॉ सावंत यांनी जागा जास्त दिल्या तर मी त्यांच्या सोबत जाईल ह्यांनी जास्त दिल्या तर त्यांच्या सोबत जाईल असे मोटे यांचे नाव ण घेता सांगितले.राजकारणात कधीच कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. माझ्या मनात भीती नाही, सावंत यांच्यापेक्षा चांगले काम करा मात्र आमच्यावर टीका करू नका असा सल्ला कांबळे यांनी मोटे यांना दिला यावेळी प्रतीक कांबळे यांच्यासह जय हनुमान ग्रुपचे पदाधिकारी हजर होते.