धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळाली असुन भूम तालुक्यातील वारे वडगाव शिवारात शेतकऱ्यांनी पिकांच्या सुरक्षेसाठी बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला आहे. बिबट्या शिकार करताना दिसत असुन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी ही माहिती तत्काळ वनविभागाला कळविल्यानंतर धाराशिव प्रशासनाने घटनास्थळी पथक रवाना केले आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक पाहणी करून परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी शिवारातील विविध ठिकाणी पाहणी, पायाचे ठसे (पगमार्क) तपासणी तसेच नागरिकांकडून माहिती संकलनाचे काम सुरू आहे. आवश्यक असल्यास पिंजरा लावण्याचाही विचार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वारे वडगाव परिसरात ऊस, ज्वारी व इतर पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात असून दाट पिकांमुळे वन्यप्राण्यांना लपण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास टाळाटाळ करत आहेत. जनावरांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त होत आहे.
वनविभागाच्या वतीने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.रात्री एकट्याने शेतात जाऊ नये. लहान मुलांना संध्याकाळनंतर बाहेर एकटे सोडू नये. जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. बिबट्या दिसल्यास त्याला चिडवू किंवा पाठलाग करू नये. तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. बिबट्या सहसा माणसांवर हल्ला करत नाही मात्र त्याला छेडल्यास किंवा घाबरवल्यास धोका संभवतो. त्यामुळे अफवा पसरवू नयेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.











