बिगुल वाजले, आचारसंहिता लागू – नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
आवाज कोणाचा ? उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 नगर परिषदेत रंगणार घमासान
उस्मानाबाद – समय सारथी
राज्यातील 92 नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील एकमेव अ वर्ग असलेल्या उस्मानाबाद व क वर्ग असेल्या भूम, कळंब, मुरूम, नळदुर्ग,उमरगा, परंडा आणि तुळजापूर अश्या 8 नगर परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात निवडणुकीचा आखाडा पेटणार असून राजकीय घमासान रंगणार आहे. निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे. आगामी महिन्यात आवाज कोणाचा ? कोण राजकीय मैदान पटकवणार हे कळणार आहे. सध्याची राज्यातील राजकीय स्तिथी पाहता शिवसेना – शिंदे गट वाद रंगणार असून निष्ठावंत व बंडखोर की उठाव यासह आरोप प्रत्यरोपच्या फेरी होणार आहेत तर शिंदे गट व भाजप हे समीकरण जुळणार का? व ते कितपत यशस्वी होणार हे पाहावे लागेल तसेच महाविकास आघाडीसह स्थानिक आघाड्यांचे पेव व राजकारण पेटणार आहे.
जिल्हाधिकारी हे 20 जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील त्यानंतर नामनिर्देशन पत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची तारीख 22 जुलै 2022 असून शेवट तारीख 28 जुलै अर्ज दाखल करता येणार आहेत.22 ते 28 जुलै या काळात सकाळी 11 ते दुपारी अर्ज भरता येईल मात्र 23 जुलै शनिवार व 24 जुलै रोजी रविवार सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज भरता येणार नाही.
नामनिर्देशन पत्र छाननी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. नामनिर्देशन पत्र अर्थात उमेदवारी मागे 8 ऑगस्ट पर्यंत घेता येणार आहे तर शेवटच्या दिवशी चिन्ह वाटप होणार आहे. 18 ऑगस्ट रोजी मतदान सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत तर दुसऱ्याच दिवशी 19 ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.