देवानंद रोचकरी यांचा आमदार निवासात मुक्काम , आश्रय देणारा आमदार कोण ? अनेक मंत्री व अधिकारी यांच्या गाठीभेटी
उस्मानाबाद – समय सारथी
मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरणी देवानंद रोचकरी यांना अटक केल्यानंतर त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांनाही अटक करण्यात आली आहे. रोचकरी यांना मुंबई येथील मंत्रालय येथून अटक केल्यानंतर यातील दुसरे आरोपी बाळासाहेब रोचकरी हे तुळजापूर पोलीस ठाण्यात रात्री 3 च्या सुमारास हजर झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. आज दोन्ही रोचकरी बंधूंना तुळजापूर येथील कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता . दरम्यान देवानंद रोचकरी हे मुंबई येथील आमदार निवास येथे मुक्कामी होते अशी सूत्रांची माहिती आहे, फरार गुन्ह्यातील आरोपी रोचकरी यांना आमदार निवासात आश्रय देणारा ‘तो’ आमदार कोण ? यावर चर्चा होत आहे तर रोचकरी हे बुधवारी शिवसेनेचे नेते तथा राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना भेटण्यासाठी गेले होते मात्र मंत्री बैठकीत व्यस्त असल्याने त्यांना थांबावे लागले आणि कँटीनमध्ये बसले असताना अटक झाली.
रोचकरी हे गुन्हा नोंद झाल्यानंतर फरार असताना त्या काळात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना मंत्रालयात भेटल्याची माहिती आहे.थोरात यांनी त्यांना तुळजापूरचा रस्ता दाखवीत त्या मार्गे येण्यास सांगितले.
फरार रोचकरी हे मुंबई येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या आदेशाने तुळजापूर पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष पथकाने रातोरात मुंबई येथे जाऊन रोचकरी यांना अटक केली आहे. तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राहूल रोटे,पोलीस हवालदार अजय सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली.गुन्हा नोंद झाल्यावर पुढील कारवाईला स्थगिती मिळण्यासाठी रोचकरी यांनी पुन्हा एकदा दिलासा मिळेल या आत्मविश्वासाने व आशेपोटी मंत्रालय गाठले होते मात्र तिथेच त्यांना उस्मानाबाद पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली.
बनावट कागदपत्रे तयार करण्यात व कटात तुळजापूर नगर परिषद, भूमी अभिलेख कार्यालयासह अन्य कोण कोण अधिकारी व कर्मचारी सहभागी होते हे पोलीस तपासात बाहेर येणार आहे. रोचकरी बंधू यांना अटक केल्यानंतर खरी या प्रकरणाच्या कारवाईला सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. रोचकरी यांच्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी व भूमिका न्यायालयात मांडून तपास करणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान असणार आहे. देवानंद रोचकरी यांच्यासह इतरांवर मंकावती तिर्थकुंड स्वतःच्या नावावर करून हडप करण्यासाठी बोगस कागदपत्रे व पुरावे तयार करणे, फसवणूक करणे यासह कलम 420, 468,469,471 व 34 सह गुन्हा नोंद आहे
संबंधीत बातम्या –
मंत्रालय ठरले केंद्रबिंदू , मंत्रालय प्रेम ठरले घातक
भूमाफिया , सावकारकी, हद्दपारीसह शिक्षा – देवानंद रोचकरी यांच्या गुन्ह्यांचा मोठा इतिहास
मंत्रालयातुन स्थगिती आणि शेवटी मंत्रालयातच अटक , पोलिसांसमोर अनेक आव्हाने
https://www.samaysarathi.com/2021/08/How-rochkari-arrested-mafiya.html