बायोमायनिंग घोटाळा – संचिका तपासून 2 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश
दिशाभूल – विलगीकरणाच्या खतापासुन नगर परिषदेच्या उद्यानांचा विकास मात्र उद्याने भकास
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेतील घोटाळ्यांची मालिका सुरूच असुन आता बायोमायनिंग (घनकचरा विलगीकरण व प्रक्रिया ) प्रकल्पची चौकशी अंतीम टप्प्याकडे जाताना दिसत आहे. या प्रकरणाची नगर परिषदेतील संचिका / अभिलेखे तपासून त्याचा स्वयंस्पष्ट अहवाल आवश्यक त्या कागदपत्रासह 2 दिवसात सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी मुख्याधिकारी वसुधा फड यांना दिले आहेत.
विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारल्यानंतर याची चौकशी करण्याचे आश्वासन विधिमंडळात दिले होते त्यानुसार याची चौकशी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे मार्फत करण्यात येणार आहे. या कामाचे कार्यादेश 25 जुलै 2019 रोजी दिले होते त्यानंतर काम न करता करोडो रुपयांची बिले काढण्यात आल्याची तक्रार आमदार धस यांनी केली होती.
पुणे येथील सेव्हन एनव्हायरमेंट कंपनीला 52 हजार 440 घन मीटर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी 2 कोटी 22 लाख रुपये देण्यात आले.सदर प्रक्रियामुळे तयार झालेल्या खताची विक्री करण्यात आली नसुन नगर परिषदेच्या उद्यानात या खताचा वापर करण्यात आल्याचे मुख्याधिकारी यांनी कळविले आहे. शहरात दैनंदिन 60 मे टन कचरा गोळा होतो त्यातील 90 % कचऱ्याचे विलगीकरण होत असल्याची माहिती विधीमंडळ सभागृहात दिली आहे.
कचऱ्यापासुन तयार झालेला करोडो रुपयांचा खत नगर परिषदेच्या उद्यानात टाकल्याचा दावा केला आहे मात्र शहरात उद्याने किती, कोणत्या उद्यानात खत टाकले आणि टाकले तर ती उद्याने बहरली नाही का ? की खतच असे निकृष्ट दर्जाचे होते त्यामुळे बहरलेली उद्याने भकास झाली ? उद्यान विकास केवळ नगर परिषद अधिकाऱ्यांना दिसला ? घोटाळा दडविण्यासाठी केलेला हा उद्योग आहे की सभागृहाला खोटी माहिती दिली याची चौकशी होणे गरजेचे आहे.