बाजार समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट – धाराशिव जिल्ह्यात अशी रंगणार लढत
ओसाड गावच्या पाटीलकीसाठी जोरदार रस्सीखेच – प्रतिष्ठा पणाला, घोडेबाजार होणार
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील 8 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असुन 144 जागासाठी 327 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापुरकर यांनी दिली. जवळपास सर्वच बाजार समितीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप – शिवसेना शिंदे गट म्हणजे महायुती अशी सरळ लढत होत आहे. तुळजापूर येथे 3 पॅनल आहेत तर इतर ठिकाणी आमने सामने लढत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा, कळंब, मुरूम, धाराशिव, तुळजापूर,भुम, वाशी, उमरगा अश्या 8 ठिकाणी निवडणुक होत आहे तर लोहारा बाजार समितीसाठी निवडणुक खर्चासाठी पैसा नसल्याने निवडणुक प्रक्रिया झाली नाही. 20 एप्रिल हा उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता त्यामुळे त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. सर्व बाजार समितीमध्ये संचालक मंडळाच्या 18 जागासाठी निवडणुक होणार आहे त्यात सहकारी संस्था गटात 11 जागा, ग्रामपंचायत गटात 4, व्यापारी गटात 2, हमाल मापाडी गटासाठी 1 जागा असणार आहे. 18 संचालक मंडळ असे 8 बाजार समितीमध्ये 144 जागासाठी 327 उमेदवार रिंगणात असणार आहेत.
परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 जागासाठी 38, कळंब 36, मुरूम 43, धाराशिव 40 , तुळजापूर 52, भुम 42, वाशी 37, उमरगा येथे 18 जागासाठी 38 असे 327 उमेदवार रिंगणात असणार आहेत. सहकारी संस्था गटात 200, ग्रामपंचायत गटात 73, व्यापारी गटात 38, हमाल मापाडी गटासाठी 16 उमेदवार रिंगणात असणार आहेत.
बाजार समिती या निवडणुका पक्षचिन्हावर लढल्या जात नसल्या तरी बऱ्यापैकी राजकीय चित्र या निवडणुकीतुन स्पष्ट होणार आहे. अनेक बाजार समितीची आर्थिक स्तिथी खराब असली तरी ओसाड गावच्या पाटीलकीसाठी सर्वच राजकीय पक्ष व नेते तन मन धनाने या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असुन ती प्रतिष्ठाची केली आहे. आजी माजी मंत्री, आमदार, खासदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.मतदार कमी असल्याने घोडेबाजाराला ऊत येणार आहे.राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी व सत्तापरिवर्तन नंतर या निवडणुकीला महत्व आले आहे.