बजाज अलायन्स विमा कंपनी विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
उस्मानाबाद – समय सारथी
बजाज अलायन्स पिक विमा कंपनी विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. 2020 पीकविमा प्रकरणात विमा कंपनीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात राज्य शासनाकडून अवमान याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा न दिल्याने ही याचिका दाखल केली असून आमदार कैलास पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलनात याचिका दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
खरीप 2020 मध्ये सोयाबीन पिकाचा 3 कोटी 98 लाख 365 शेतकऱ्यांनी विमा भरला होता. त्यातील 50 हजार 881 शेतकऱ्यांना कंपनीने नुकसानीची 56 कोटी दिले व उर्वरित 3 लाख 47 हजार 484 शेतकऱ्यांना 574 कोटी देणे आवश्यक आहे. त्यापैकी 201 कोटी विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयात जमा केले असून अद्याप 373.25 कोटी नुकसान भरपाई येणे बाकी आहे ते न दिल्याने ही याचिका दाखल केली आहे.