बँक बुडविण्याच्या ‘दंडनाईक पॅटर्न’ – अरविंद पतसंस्थेतील गोरगरिबांच्या कोट्यावधींच्या मुदत ठेवी मिळेनात
चौकशी समिती गठीत – लेखापरीक्षण अहवालात गंभीर चुका उघड – कारवाईकडे लक्ष, आरोपी सापडेनात
मुदत संपून ७ वर्षाचा कालावधी लोटला तरी पैसे मिळेनात – ठेवीदारांची फसवणूक, गुन्हा नोंद करा
धाराशिव – समय सारथी
वसंतदादा नागरी सहकारी बँकेत कोट्यवधी रूपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात फरार आरोपी भाजपचे स्थानिक नेते तथा तत्कालीन चेअरमन विजय दंडनाईक यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा नोंद झालेला असतानाच दंडनाईक यांचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.
दंडनाईक यांचे सुपूत्र रोहितराज दंडनाईक हे चेअरमन असलेल्या अरविंद नागरी सहकारी पतसंस्थतेही कोट्यवधी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याची तक्रार ठेवीदार यांनी केली आहे. पतसंस्थेच्या लेखापरिक्षण अहवालात गंभीर बाबी व दोष दिसून आल्याने सहकार विभागाने कलम ८८ नुसार या पतसंस्थेची चौकशी प्रस्तावित केली आहे.
सहाय्यक निबंधक डॉ. अंबिलपुरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. पतसंस्था स्थापन झालेल्या तारखेपासून संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार तपासले जाणार आहेत. एकंदरीत या घटनेने बँक बुडविण्याच्या दंडनाईक पॅटर्नची चर्चा होत आहे.
वसंतदादा नागरी बँकेप्रमाणेच अरविंद पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवी मुदत संपून सात वर्षाचा कालावधी झाला तरी दिल्या जात नाहीत. त्यामुळे ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी चेअरमनसह, व्यनस्थापक, संचालक मंडळ, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठेवीदारांनी पोलीस अधीक्षक, सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे केली आहे.
वसंतदादा बँकेने ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी धाराशिव येथील शहर पोलीस ठाण्यात २७ जुलै रोजी तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक, तत्कालिन व्यवस्थापक दीपक देवकते, तत्कालिन संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या विरोधात विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित आरोपींचा अटकपुर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. यातील सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी सापडत नसल्यास त्यांना फरार घोषित करुन त्यांची संपत्ती जप्तीची कारवाई करावी अशी मागणी ठेवीदार करीत आहेत.
संपूर्ण जिल्ह्यातील ठेवीदारांमध्ये खळबळ उडालेली असतानाच, आता विजय दंडनाईक यांचे सुपूत्र रोहितराज दंडनाईक हे चेअरमन असलेल्या धाराशिव येथील छत्रपती शिवाजी चौकातील (तुळजाभवानी शॉपींग सेंटरमध्ये कार्यालय) अरविंद नागरी सहकारी पतसंस्थेने ठेवीदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या बँकेच्या कार्यालयाला कायम टाळे असते, अनेक ठेवीदार रोज चकरा मारून निघून जातात.
धाराशिव शहरातील व तालुक्यातील शेतकरी, शेतमजुर, व्यापारी, छोटे व्यवसायिक, शिक्षक, प्राध्यापक मंडळी जादा व्याज मिळते (१४ टक्के) या अमिषाला बळी पडली आहेत. कष्टातून बचत केलेली रक्कम अनेकांनी अरविंद पतसंस्थेत ठेव म्हणून ठेवलेली होती. अनेकांच्या ठेवीची मुदत २०१४ मध्ये संपलेली आहे. तरीही ठेवीदारांना रक्कम मिळत नाही. ठेवीदार पतसंस्थेत हेलपाटे मारून थकले. पण ठेवीची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे वैतागलेल्या ठेवीदारांनी पोलीस अधीक्षक, सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अरविंद पतसंस्थेचे चेअरमन रोहितराज दंडनाईक, व्यवस्थापक, संचालक मंडळ, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे.
हे आहे जुने संचालक मंडळ :
रोहित विजयकुमार दंडनाईक (चेअरमन), व्यवस्थापक, सुरेश रामकृष्ण भोरे (व्हाईस चेअरमन), रामराजे रावसाहेब पाटील, प्रशांत विष्णुदास तडवळकर, स्वयंम दीपक अजमेरा, सय्यद रफिक अखिल अहमद, दत्तात्रय श्रीरंग लोकरे, अशोक परसराम देवकते, भारत दत्तात्रय शिंदे, सुरेश काशिनाथ मलकुनाईक, उमेश विठ्ठल सातपुते, सिंधू सुभाष सरवदे, शशिकला उद्धव हालकरे, बळीराम रानबा अंकुश (मयत)
नविन संचालक मंडळ :
रोहितराज विजय दंडनाईक, बोंदर संजय सायसराव, भीमा शिवराम दंडनाईक, राजन रमेश देशमुख, अण्णासाहेब रंगनाथ पाटील, युसूफ यहाबुद्दीन बागवान, सिंधू सुभाष सरवदे, राधा सचिन जाधव, सुशांत अर्जुन लष्करे, भारत दत्तात्रय शिंदे, काशिनाथ हणुमंत भोजने आदी.
नवे व जुने संचालक मंडळ ठेवीदारांच्या ठेवी परत न दिल्याप्रकरणी जबाबदार आहेत. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ठेवीदारांनी पोलीस अधीक्षक, सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली आहे.