फटाका कारखान्यात स्फ़ोट – 2 जण गंभीर जखमी, तेरखेडा येथील अवैध फटाका उद्योगाचा मुद्दा पुन्हा चर्चेत
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथे एका फटाका कारखान्याला भीषण आग लागली आहे. या आगीत दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती असुन जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. भर वस्तीत फटाका कंपनीला आग लागल्याने वस्ती रिकामी केली जात आहे. फायर ब्रिगेड, पोलीस व महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. आग सुरु असल्याने फटाक्याचे स्फ़ोट गेली 1 तासापासून सुरु आहेत. फटाक्याचे स्फोट होत असल्याने आग विझवण्यात अडचण येत आहेत.
भरवस्तीत एका पत्र्याच्या शेडमध्ये फटाका निर्मिती व साठवून ठेवण्याचा हा उद्योग सुरु होता. येथे परवानगी कोणी व कोणत्या नियमात दिली यासह अनेक मुद्दे समोर आले असुन कारवाई करावी अशी मागणी होत आहे. तेरखेडा या भागात अनेक ठिकाणी असे उद्योग सुरु असुन त्यावर महसूल व पोलिस विभागाचे नियंत्रण नसून या भागातील कारखाने यांचा सर्व्हे करुन कारवाई करावी अशी मागणी होत आहे.जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे व पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या अवैध फटाका उद्योगाकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तेरखेडा येथे अनेक ठिकाणी वस्तीत व घरात फटाके निर्मिती केली जाते यामुळे अनेक नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.