‘ बाप म्हणतात तुळजापूरचा ‘ सोशल मीडियावर कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव
तालुक्याचा 7/12 तुमच्या आईबापाच्या नावावर आहे का? मग कोणाच्या आईबापाच्या नावावर आहे, ते सांगा. मग 7/12 रिकामा करुन घेतो आम्ही, अशा आशयाचे फिल्मी डायलॉग असलेले देवानंद रोचकरी यांचे फोटोसह व्हिडीओ त्यांच्या समर्थकांनी स्थगिती आदेश मिळाल्यानंतर सोशल मिडीयावर व्हायरल केले.
उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील प्राचीन महात्म्य असलेला मंकावती तिर्थकुंड हडप केल्याचा प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशाला नगर विकास मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. तुळजापूर येथील भाजप नेते देवानंद साहेबराव रोचकरी यांनी या प्रकरणात मंत्र्यांकडे अपील करताना त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता व म्हणणे न ऐकून घेता निकाल दिल्याचे म्हटले होते त्यावरून ही स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगिती नंतर रोचकरी समर्थकांनी सोशल मीडियावर ‘ बाप म्हणतात तुळजापूरचा ‘ असे पोस्ट करीत आनंदोत्सव साजरा केला. या प्रकरणी आता नगर विकास मंत्र्यांकडे सुनावणी होणार आहे. मंकावती कुंड हे देवानंद रोचकरी यांचे आजोबांचे आजोबा मूळ मालक शेटीबा मंकावतीराव रोचकरी यांच्या मालकीची व वडिलोपार्जित असल्याचा लेखी दावा मंत्र्यांकडे केला आहे तसेच या प्राचीन कुंडाची नोंद त्यांच्या नावावर घ्यावी अशी मागणी रोचकरी यांनी केली आहे.मंकावती कुंडावर अनेक ठिकाणी विनापरवाना अनधिकृत बांधकाम केल्याचे दिसते या प्रकरणी प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील तब्बल 1 हजार 244 चौरस मीटर आकाराच्या मंकावती कुंडाची महती स्कंद पुराण , तुळजाई महात्म्य व देविविजय पुराणात आहे.गरीबनाथ दशअवतार मठाचे महंत सावजी महाराज, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष तथा मनसेचे जिल्हा संघटक अमर राजे कदम व इतरांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांना 31 मे 21 रोजी लेखी तक्रार करून तुळजापूर शहरातील प्राचीन श्री विष्णू तीर्थ (सध्या मंकावती कुंड नावाने प्रचलित) बेकायदेशीर काम करणाऱ्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे,नगर परिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे व भूमी अभिलेख कार्यालयाच्या उप अधीक्षक वैशाली गवई यांच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीची नेमणूक केली होती या समितीने केलेल्या अहवालांनंतर जिल्हाधिकारी यांनी फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते.
मंकावती तीर्थकुंडाची मालमत्ता ही नगर परिषद मालकीची कागदपत्रांची पाहणी व स्वतः जिल्हाधिकारी यांनी भेट देऊन अहवाल दिला होता. तुळजापूर नगर परिषद यांनी 12 नोव्हेंबर 1982 रोजी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र लिहून मंकावती कुंड तुळजापूर नगर परिषदेच्या स्थापनेपूर्वी तुळजापूर लोकल फंडकडे व्यवस्थापन होते. तत्कालीन हैद्राबाद संस्थान शासनाने मंकावती कुंड लोकल फंडास व्यवस्थापनासाठी सोपविले होते त्यामुळे या कुंडाची मालकी नगर परिषदेची आहे.मंकावती कुंडाच्या बनावट कागदपत्रे व पुरावे तयार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावे तसेच पुरातत्व संवर्धन कायदा 1904 मधील तरतुदीच्या अनुषंगाने कार्यवाही करावी असे आदेश होते मात्र याला स्थगिती दिली त्यामुळे आता या प्रकरणाकडे देविभक्तांचे लक्ष लागले आहे