प्रभाग रचना सादर तर बुधवारी मतदार यादी प्रसिद्ध होणार – उस्मानाबाद नगर परिषद निवडणुकीत 20 प्रभाग व 41 सदस्य असणार
उस्मानाबाद – समय सारथी
नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाकडून प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे. उस्मानाबाद नगरपरिषद निवडणुकीत २० प्रभाग तर ४१ सदस्य असणार असून बुधवारी ५ जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिध्द होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यांनी दिली. नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. शहरातील प्रभाग १ ते १९ या प्रभागात प्रत्येकी दोन तर २० नंबर प्रभागात ३ सदस्य असणार आहेत.
नोव्हेंबर २०१६ च्या निवडणुकीत मतदार संख्या ८५ हजार होती ती आता जवळपास १ लाख ५ हजार झाल्याने प्रभाग संख्या ही १९ वरून २० तर सदस्य संख्या ३९ वरून ४१ होणार आहे. ३९ सदस्य असलेल्या नगर परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक १७, शिवसेना ११, भाजप ८ तर काँग्रेसचे २ व एक सदस्य अपक्ष निवडून आले होते तर शिवसेनेचे मकरंद राजे निंबाळकर हे नगराध्यक्ष म्हणून जनतेतून निवडून आले होते व त्यांच्या रूपाने शिवसेनेची पालिकेवर सत्ता राहिली आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजप प्रवेश केल्यानंतर नगर परिषदेतील आकड्यांचे गणित बिघडले. राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हांवर निवडून आलेल्या १७ सदस्य पैकी आमदार राणा समर्थक व राष्ट्रवादीत राहिलेले सदस्य असे दोन गट पडले.
उस्मानाबाद नगर परिषद सदस्य व नगराध्यक्ष यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने शुक्रवारी ३१ डिसेंबर पासून नगर परिषदेवर प्रशासक यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना अनुषंगाने निवडणुका या वेळेत पूर्ण झाल्या नाहीत. नगर परिषद प्रशासनने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे तर इच्छुकांची भाऊगर्दी मोठी आहे त्यामुळे त्यांनी निवडणुकीची तयारी केली आहे.
सध्याच्या स्तिथीवरून नगर परिषद निवडणुकीत भाजप व शिवसेना यांच्या दरम्यान थेट लढत होणार असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीसाठी खासदार ओम राजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील व नगराध्यक्ष मकरंद राजे हे शिवसेनेची धुरा सांभाळत आहेत तर भाजपकडून आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हातात सूत्र असणार आहेत. काँग्रेसकडे नेतृत्वाचा आभाव तर राष्ट्रवादीकडे कोणाचे नेतृत्व यावरून टोकाची गटबाजी आहे.