प्रत्येक खात्यात एक राजे, एक वाझे मग उस्मानाबादचे ते ‘राजे’ कोण ?
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सूचक वक्त्याव्याने खळबळ
उस्मानाबाद – समय सारथी
राज्य सरकारच्या प्रत्येक खात्यात एक राजे व एक वाझे आहे मग उस्मानाबादचे ते ‘राजे’ कोण ? आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या या सूचक वक्त्याव्याने खळबळ उडाली आहे. आमदार पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील नेत्यांचे नाव घेतले नसले तरी त्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वसुली कांडाकडे यानिमित्ताने लक्ष वेधले आहे. भाजप आमदार राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली येडशी टोल नाक्यावर ओबीसी आंदोलन करण्यात आले त्यावेळी त्यांनी हे आरोप करीत प्रश्नचिन्ह निर्माण केले.
शिवराळ भाषा वापरता उठसूट बेछूट आरोप करणे हा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा स्वभाव नाही.अतिशय शांत, संयमी स्वभावाचे आमदार पाटील यांनी जाहीर भाषणात आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे 100 कोटी रुपयांचे कथित हफ्ते वसुली प्रकरण देशभर चांगलेच गाजत आहे, या प्रकरणात 100 कोटींचे वसुली खुलासा पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी केला होता.
प्रत्येक विभागात एक राजे व एक वाझे असा कारभार राज्यात सुरू आहे. आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाबतीत काही वेगळी म्हण काढायची असेल तर काढा तुम्ही. पैसा काढणे ,चुकीच्या गोष्टी करणे व खोटे बोलणे या व्यतिरिक्त दुसरे काम नाही. सामान्य जनता व समाजाच्या अडचणी बाबत त्यांना काही देणेघेणे नाही असा आरोप केला. प्रदीर्घ काळानंतर आमदार राणा पाटील यांनी जाहीर भाषणात जिल्ह्यातील राजकारणावर टीका केली असुन त्यामुळे उस्मानाबादचे ते वसुलीखोर ‘राजे’ कोण यांची चर्चा चांगलीच रंगली आहे.