पोलिस कोठडी – तत्कालीन मुख्याधिकारी यलगट्टे यांना 1 दिवसांची पोलिस कोठडी तर अन्य 2 आरोपी फरार
धाराशिव – समय सारथी
नगर परिषदेचे तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे यांना कोर्टाने 1 दिवसांची पोलिस कोठडी दिली असुन या प्रकरणात लेखापाल सुरज संपत बोर्डे, अंतर्गत लेखानिरीक्षक प्रशांत विक्रम पवार हे 2 आरोपी फरार आहेत. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेसाठी आलेला 3 कोटी 14 लाख रुपयांचा निधी रमाई आवास योजनेच्या खात्यात जमा करुन त्यातील 21 लाख 64 हजार रकमेचा अपहार व फसवणूक केल्या प्रकरणी यलगट्टे यांच्यासह लेखापाल सुरज बोर्डे, अंतर्गत लेखानिरीक्षक प्रशांत पवार यांच्यावर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने कलम 409, 420, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानंतर यलगट्टे यांना पोलिसांनी पुणे येथील त्यांच्या घरून अटक केली.
भाजपचे विधानपरिषदेतील आमदार सुरेश धस यांनी नगर परिषदेच्या निधीत अपहार केल्याची व यलगट्टे यांच्या काळात झालेल्या विविध योजना याचे स्पेशल ऑडिट करण्याची मागणी केली होती त्यावरून जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी चौकशीचे आदेश दिले होते त्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा दैनिक समय सारथी वृत्तपत्राने याचा वारंवार पाठपुरावा केला होता.
जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी गोविंद बोंदर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने लेखी अहवाल दिला होता त्यानंतर धाराशिव नगर परिषदेचे लेखापाल अशोक फरताडे यांना मुख्याधिकारी यांनी प्राधिकृत केले होते.
धाराशिव नगर परिषदेतील भंगारचोरी, बोगस बांधकाम परवाना, अट्रॉसिटी, चेक बाउंस या प्रकरणात यलगट्टे यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता हा त्यांच्यावरील धाराशिव येथील 4 था गुन्हा दाखल आहे. यापुर्वी नांदेड जिल्ह्यातील भोकर, माजलगाव अश्या ठिकाणी गुन्हे नोंद होते तर धाराशिव येथे पुर्वी गुन्ह्यात ते तब्बल 21 दिवस पोलिस कोठडी व जेलमध्ये होते त्यानंतर आता एक दिवसासाठी पोलिस कोठडीत आहेत.
तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांचे निलंबन करण्यात आले आहे तर त्यांचे मुख्याधिकारी गट अ वरून गट ब असे डिमोशन करण्यात आले आहे. बायोमायनिंग, गुंठेवारी प्रकरणात चौकशी अंतीम टप्प्यात आहे तर विधीमंडळ हक्कभंग कारवाई 2 वेगवेगळ्या प्रकरणात प्रस्तावित आहे.