पालकमंत्री गडाख यांना भाजपकडून जिल्हा भेटीचे आग्रहाचे निमंत्रण
कोरोना संकटात पालकमंत्री गेल्या अडीच महिन्यापासून गायब
आरोग्य यंत्रणा ढासळली तरी नॉट रिचेबल पालकमंत्री यांना जाग येईना
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने निर्माण झालेल्या परस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व जिल्हातील नागरिकांना सहकार्य करण्यासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख यांना उस्मानाबाद जिल्ह्यात येण्याचे आग्रहाचे आमंत्रण भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी दिले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना स्तिथी गंभीर झालेली असतानाही मृद व जलसंधारण मंत्री गडाख गेली अडीच महिन्यापासून जिल्ह्यात न आल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. उस्मानाबाद जिल्हयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे तीनतेरा झाले असून खासगी रुग्णालयात रेमडीसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे तर शासकीय रुग्णालयात अनेक त्रुटी आहेत मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा पालकमंत्री यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. नॉट रीचेबल असलेल्या या मंत्र्यानी जनतेसमोर येऊन जबाबदारी व अनेक प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे.
भाजपने काढलेल्या जाहीर निमंत्रण व पत्रकात पालकमंत्री यांच्यावर कडाडून टीका केली आहे. आदरणीय पालकमंत्री साहेब, 26 जानेवारीच्या ध्वजारोहण नंतर आपला पदस्पर्श जिल्ह्यात झालाच नाही. जिल्ह्यातील जनता आतुरतेने आपण याल व आपल्या नावातील शंकरा प्रमाणे तिसरा डोळा उघडून कोरोनाचा नायनाट कराल यासाठी आपली वाट पाहत आहे.पालकमंत्री या नात्याने आपण जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांना आपण भेटाल, त्यांना धीर द्याल, जे बाधित आहेत त्यांना औषध उपचारासाठी काही तरी आरोग्य यंत्रणा उभी कराल, अबाल वृद्ध, महिला,लहान मुले यांच्या आरोग्याची काळजी घ्याल अश्या वेड्या आशेवर आपली जिल्ह्यात वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा लॉक डाउन ची समस्या येईल म्हणून छोटा व्यावसायिक जगावं की मरावे, कुटुंब कसे चालवावे या विवंचनेत असताना पालकमंत्री या नात्याने या प्रश्नांची सोडवणूक आपण कराल यासाठी आपल्या व्यावसायाच्या दारातच तो आपली वाट पाहतोय, डोळ्यात अश्रू घेऊन हातावर पोट असणारे असंख्य व्यक्ती आज हवालदिल झालेत. प्रचंड यशस्वी असणाऱ्या अश्या या तीन तोंडी सरकारचे प्रतिनिधी म्हणून दत्त म्हणून उभे रहावे व या सर्वांच्या समोर यावे व त्यांना दिलासा द्यावा, एवढीच तर त्यांना अपेक्षा व्यक्त केली आहे.
आई तुळजापूर भवानीच्या जिल्ह्याचे तुम्ही पालकमंत्री आहात याच थोडं भान ठेवा, अन जिल्ह्यात या समस्येवर उपाय काढण्यासाठी लवकरात लवकर प्रशासणासोबतच्या बैठकीला आपण या हेच आग्रहाचे निमंत्रण जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकांच्या हृदयातून तुम्हाला देतो आहोत असे नमूद केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा ३०० च्या पार गेला असून अडीच हजारावर रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना साधे जेवण सुद्धा चांगल्या प्रतीचे मिळत नाही तर अन्य सुविधांचेही तेच हाल आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या आर्थिक नियोजनाची बैठक उरकून पालकमंत्री जानेवारी महिन्यात गेले असून त्यानंतर ते आले नाहीत.यानिमित्ताने उस्मानाबाद जिल्ह्यात मंत्रीपद न मिळाल्याची उणीव भासत आहे .