2009 ची उस्मानाबाद विधानसभा लढण्याची होती तयारी – कोर्टानेही दिली होती परवानगी पण….
धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी या दुहेरी हत्याकांड खटल्यातील आरोपी तथा माफीचा साक्षीदार पारसमल जैन हा अटक असताना जेलमधुन 2009 मध्ये उस्मानाबाद व मुंब्रा विधानसभेची निवडणुक लढवणार होता, कोर्टाने त्याला तशी परवानगी दिली होती. 2009 च्या निवडणुकीत तो राणाजगजीतसिंह पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात निवडणुक लढवणार होता. 2009 साली घडलेल्या अनेक घडामोडीमुळे तो निवडणुकीच्या मैदानात पुर्ण तयारीने उतरणार होता. एकेकाळी हत्येची ‘सुपारी’ घेणारा विरोधी भुमिकेत गेला त्याचे कारणही तसे होते.
पारसमल हा या हत्याकांडाच्या ‘केंद्र’ स्थानी आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे या खटल्याची सुनावणी अंतीम टप्प्यात असुन 9 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 1985 पासुन पोलिसांचा अधिकृत विशेष खबरी, सोने चांदी, मार्बल व्यापारी, व्यापारी संघटनेचा अध्यक्ष, कापड दुकानदार असा प्रवास आहे. लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार करणारा पारसमल जैन हा आर्थिक संकटात आला आणि गुन्हेगारीच्या मार्गाला लागला, त्याचा हा गुन्हेगारी विश्वातील प्रवास थक्क करणारा आहे.
पारसमल जैन बादला याने कोर्टात त्याच्या जबाबात व उलट तपासात अनेक धक्कादायक बाबी सांगितल्या आहेत. जैन हा राजस्थान राज्यातील पारसाली या गावचा असुन तो मुंबईत स्थायिक झाला होता. त्याला 2005 साली एड्स हा आजार होता, आर्थिक अडचण व आजारावर उपचार करण्यासाठी आणि मुलीचे लग्न करण्यासाठी त्याने पवनराजे यांच्या हत्येची सुपारी घेतली, त्याच्या मुलीचे 1 जुलै 2007 साली लग्न झाले, लग्नाला हत्याकांडातील काही आरोपी सहकुटुंब हजर होते असे कोर्टात सादर केलेल्या पुराव्यातील फोटोवरून दिसते. जैनला 25 मे 2009 रोजी हत्याकांडात अटक झाली, त्यानंतर त्याने जेलमधून 2009 च्या विधानसभेची तयारी केली.
एका गुन्ह्यात जैन पोलिस कोठडीत असताना पोलिस निरीक्षक दिनेश कदम म्हणाले की, तुम्ही जामिनीसाठी अर्ज करू नका अश्या राकेश मारिया यांच्या सुचना आहेत. मी दरोडा, चोरी केली नाही मग गुन्हा दाखल का केला ? तुम्ही मला, डॉ पाटील व इतर आरोपीना खुनाच्या गुन्ह्यात का अटक करत नाहीत ? डॉ पाटील यांना अटक कधी करणार ? तेव्हा कदम म्हणले की आम्ही दरोडा गुन्ह्यात पर्याप्त पुरावा नसल्याने 169 फायनल करणार आहोत व तुला जमीन देऊ मात्र तु विधानसभा निवडणुका संपेपर्यंत शांत रहा. कोणाला काही बोलू नकोस. डॉ पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणाजगजीतसिंह पाटील हे 2009 विधानसभा निवडणुक लढवणार असुन त्याचा निकाल लागला की आम्ही तुला जामिनावर सोडू.
लोकसभा निवडणुक निकाल लागून डॉ पद्मसिंह पाटील राष्ट्रवादीकडून खासदार झाले मात्र त्यांच्या वतीने कोणीही मला व शुटर दिनेश तिवारी याला भेटायला जेलमध्ये आले नाही. आमच्यावर एकामागून एक असे खोटे गुन्हे नोंद होत असल्याने मी माझी मुलगी वर्षा हिला सीबीआयला पत्र लिहून हत्याकांडाची माहिती दे असे म्हणालो त्यानुसार तिने 27 एप्रिल 2009 ला पत्र दिले, असे जैन याने त्याच्या कोर्टातील जबाबात सुनावणीवेळी सांगितले. काही शब्द देऊन वाऱ्यावर सोडले, शिवाय उलट खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने तो फुटला व हत्याकांडाचा खुलासा केला.
3 जुन 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाल्यानंतर 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी डॉ पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने अटक केली. राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने 20 ऑगस्ट 2009 रोजी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात ठेवला आहे.
पारसमल जैन याने किला कोर्ट न्यायाधीश यांच्याकडे मुंबईतील मुंब्रा आणि उस्मानाबाद (धाराशिव) या मतदारसंघांमधून 2009 सालची विधानसभेची निवडणूक लढविण्यास परवानगी मागितली होती. न्यायालयाने परवानगी दिली होती मात्र त्या दिवशी नामनिर्देशन दाखल करण्याची तारीख संपलेली होती त्यामुळे मी ती निवडणूक लढवू शकलो नाही असे त्याने उलट तपासात सांगितले आहे.
उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात 2009 च्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर हे शिवसेना पक्षाकडून 16 हजार 974 मतांनी विजयी झाले होते त्यांना 1 लाख 709 तर राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना 83 हजार 735 मते पडली होती. मुंब्रा विधानसभा मतदार संघात 2009 साली जितेंद्र आव्हाड हे 15 हजार 689 मतांनी निवडुन आले. त्यांना 61 हजार 510 तर शिवसेनेचे राजन किणे यांना 45 हजार 821 मते पडली. राजकीय भुमिका वेगळ्या असतात, मी आजही डॉ पद्मसिंह पाटील यांना माझा बाप मानतो, हे जाहीररित्या सांगतो, हे सांगताना मला लाज वाटत नाही असे आव्हाड यांनी नुकतेच तुळजापूर येथे मंदीर जीर्णोद्धारच्या काही कामाला विरोध करायला आल्यावर म्हणाले होते.
डॉ पद्मसिंह पाटील यांना 25 सप्टेंबर 2009 रोजी जामीन मिळाला. 13 ऑक्टोबर 2009 रोजी विधानसभा निवडणुका होऊन 22 ऑक्टोबरला निकाल लागला, त्यात राणाजगजीतसिंह पराभुत झाले. हत्याकांड व डॉ पाटील यांच्या अटकेनंतरची ही पहिली सार्वत्रिक निवडणूक होती. अपक्ष म्हणुन पवनराजे यांनी डॉ पाटील यांच्या विरोधात 2004 साली निवडणुक लढवली, त्यात डॉ पाटील 484 मतांनी विजयी झाले होते. 2009 च्या पराभवानंतर त्यांनी सध्या ते सक्रीय राजकारणापासुन अलिप्त आहेत.
जैन याचे दिवा व ठाणे येथे सोने चांदीचे पारसमणी नावाचे दुकान होते, मुंब्रा येथील दुकानातून तो मार्बल व ग्रेनाईडचा व्यापार करीत असे. त्याच्या 3 सोन्याच्या दुकानात जवळपास 4.5 किलो सोने व 30 किलो त्यावेळी चांदी होती. त्याने स्वीटमार्ट व सनशाईन सोशल क्लब नावाने पत्याच्या क्लब सुरु केला आणि त्याला त्यात भागीदार यांच्यासोबत झालेले मतभेद, त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे त्याने गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला.
1985 साला पासुन तो पोलिसांचा स्पेशल खबरी होता, पोलीसांनी त्याला तसे ओळखपत्र दिले होते. तो पोलिसांना ‘टीप’ देत असे त्यानंतर पोलिस कारवाई करीत असे. गुन्हेगार, पोलिसांचा खबऱ्या व गुन्हेगारी विश्व या जाळ्यात अडकत गेला व स्वतः एका दुहेरी हत्याकांडात तो आरोपी बनला. हत्येच्या गुन्ह्यात काय शिक्षा मिळू शकते याची त्याला माहिती व कल्पना असल्याचे त्याने कोर्टात सांगितले.