पाद्य पुजेची तयारी,अनेक वेळा स्मरणपत्रे तरी माहिती दडवली
धाराशिव नगर परिषदेचे बँक खाते व चेक प्रकरण विधीमंडळ हक्कभंग समितीकडे
धाराशिव – समय सारथी
अधिकाऱ्यांची पाद्य पुजा करू पण माहिती द्या. तत्कालीन जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा लेखी स्मरणपत्रे तरी माहिती जाणीवपूर्वक दडवली गेली असल्याचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या पत्रव्यवहारवरून समोर आले आहे. धाराशिव नगर परिषदेचे बँक खाते व चेक प्रकरण माहिती न मिळाल्याने विधीमंडळ हक्कभंग समितीकडे गेले आहे. माहिती का दिली नाही हे एक गुपित आहे.हक्कभंग नोटीस नंतर काय खुलासा येतो व तो मान्य होतो का हे पहावे लागेल.
जिल्ह्यातील विधानसभेचे आमदार, खासदार हे गप्प असताना विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस हे मात्र जिल्ह्यातील अनेक बाबी,अपहार याचा पाठपुरावा करीत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नगर परिषदेत भंगार चोरी, कोरोना काळातील बिले वाटप, नियमबाह्य कामे तर पंचायत समितीमधील शोषखड्डे, मातोश्री पानंद रस्ते यासह शेवगा लावगड घोटाळा असे विषय त्यांनी उघड केले आहेत. हितसंबंधाचे राजकारण व प्रशासकीय कामकाज न करता धस काम करीत असल्याने त्यांचा अनेकांनी धसका घेतला आहे.
धाराशिव नगर परिषदेच्या बँक खाती व बाउन्स झालेले चेक प्रकरणात आमदार सुरेश धस हे गेली 6 महिन्यापासून माहिती मागत आहेत, त्यासाठी त्यांनी लेखी पत्र, स्मरण पत्र, लक्षवेधी, तारांकित प्रश्न केले मात्र त्यांना ती परिपूर्णपणे दिली जात नाही अशी त्यांची तक्रार आहे. एकीकडे प्रशासकीय कामाची माहिती ही खुली व पारदर्शक कारभारावर सरकारकडून भर दिला जात असताना धाराशिव जिल्ह्यात मात्र माहिती ही दिली जात नाही. विधान परिषद या वरिष्ठ सभागृहाच्या एखाद्या आमदाराला माहिती मिळण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार व संघर्ष करावा लागत आहे तर सामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील हे यावरून दिसते.
आमदार सुरेश धस यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना लेखी स्मरणपत्र लिहीत माहिती मागवली मात्र ती दिली गेली नाही शेवटी कंटाळून आमदार धस यांनी लेखी पत्र देत पाद्य पुजा करुन द्या पण माहिती द्या अशी भुमिका घेतली. बेजबाबदार अधिकारी यांची पाद्यपुजा करण्यासाठी सोबत घंगाळ, स्वच्छ पाणी, गुलाबपुष्प, चौरंग, आरतीचे ताट व मंत्र म्हण्यासाठी उपाध्यय आणण्याची परवानगी द्या असे पत्र लिहले तरी माहिती दिली नाही. आता हेच पाद्यपुजा पत्रव्यवहार व इतर मुद्दे विधीमंडळ हक्कभंग समिती समोर गाजणार असल्याचे कळते.
अनेक ठिकाणचे साहित्य गायब – भंगारचोरी प्रकरणात अभय कोणाचे ? पोलिसांनी केला वारंवार पत्रव्यवहार
धाराशिव नगर परिषदेच्या आवारात झालेल्या साहित्य चोरीचे प्रकरण देखील चांगलेच गाजत आहे.लाखो रुपयांचे भंगार चोरीला गेले असले तरी काही हजाराचे साहित्य चोरीला गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली. त्यात काही कर्मचारी यांना बळीचा बकरा बनविण्यात आले. पोलिसांना नगर परिषद प्रशासनाने तपासात सहकार्य व कागदपत्रे न दिल्याने आरोपीची अटकपूर्व जामीन झाली त्यानंतर ही बाब पोलिसांनी लेखी पत्र देऊन नमूद केली तरीही प्रशासन जागे झाले नाही. कचरा डेपो येथील लाखो रुपयांची मशीन, उजनी पाणी पुरवठा योजनेचे साहित्य असे अनेक ठिकाणी असलेले साहित्यरुपी लाखो रुपयांचे भंगार गायब असल्याचे कळते मात्र त्यालाही अभय देत लपविले जात आहे.
कनिष्ठ अधिकारी यांनी चुका करायच्या, अपहार करायचा आणि प्रकरण वाढून पोलिसात, विधीमंडळात तारांकित प्रश्न व इतर अडचण झाली की वरिष्ठ अधिकारी त्यात गुंततात मग त्यांना त्याचे उत्तर द्यावे लागते व सर्व बाबीना सामोरे जावे लागते. वरिष्ठ अधिकारी तो विषय प्रतिष्ठाचा बनवून त्याचे ते पाहून घेतात मग सुखरूप सुटका होते असा जणू काही पायंडा सध्या जिल्ह्यात दिसत आहे. चुक काहींची त्रास व शिक्षा सर्वाना असाच काहीसा प्रकार आहे.