पवनराजे निंबाळकर बँकेला अरविंद नागरी बँकेने लावला कोट्यावधी रुपयांचा चुना – 2015 पासुन मुदतठेव अडकली
फसवणूकीच्या गुन्ह्यात कोर्टात पैसे भरण्याची तयारी – तात्पुरता दिलासा मिळाल्यानंतर दंडनाईक समर्थकांनी फोडले फटाके
धाराशिव – समय सारथी
अरविंद नागरी सहकारी पतसंस्थेने अनेक ठेवीदार यांना ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून करोडो रुपयांचा गंडा घातला असुन मुदत संपली तरी अनेक ठेवीदार यांच्या ठेवी गेली 7 ते 10 वर्षांपासुन दिल्या नाहीत. अरविंद नागरी पतसंस्थेने शहरातील अनेक नामांकित बँकाना चुना लावला असुन त्यात पवनराजे निंबाळकर नागरी बँकेचा सुद्धा समावेश आहे. अनेक ठेवीदार यांचे मुदत ठेवीचे पैसे अडकले असुन बँकेचे कार्यालय गेली अनेक वर्षांपासून कुलूपबंद आहे.
अरविंद बँकेचे चेअरमन रोहितराज विजयकुमार दंडनाईक यांच्यासह संचालक मंडळावर तीन ठेवीदाराची 10 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी कलम 420, 406, 409,120 ब व महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हीतसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 मधील कलम 3 व 4 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात रोहित दंडनाईक यांनी कोर्टात अटकपुर्व जामीन मिळावा यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला त्यावेळी रोहित दंडनाईक यांच्या वतीने वकिलांनी कोर्टात 3 ठेवीदार याचे मुदत ठेवीच्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम कोर्टात भरण्याची तयारी दाखवली त्यावरून त्यांना पुढील सुनावणी पर्यंत तात्पुरता दिलासा दिला आहे.
कोर्टाने दिलासा देताच दंडनाईक समर्थकांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. या प्रकरणाचा तपास आनंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्याकडून उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी 7 सप्टेंबरला कोर्टात होणार आहे. फसवणूकीचे हे प्रकरण केवळ 3 तक्रारदार यांच्या पुरते मर्यादित नसुन अनेक ठेवीदार यांची मुदतठेवीचे पैसे दिलेले नाहीत त्यामुळे त्यांनी समोर येऊन पोलिसांत किंवा कोर्टात तक्रार देण्याची गरज आहे.
पवनराजे निंबाळकर बँकेने अनेक वेळा अरविंद नागरी बँकेकडे लेखी मागणी करूनही मुदत ठेवीचे पैसे दिले नाहीत. पवनराजे बँकेने 8 डिसेंबर 2012 व 12 फेब्रुवारी 2013 रोजी लेखी पत्र अरविंद बँकेला दिले मात्र मुदत ठेवीच्या रकमा दिल्या नाहीत. अनेक वेळा अरविंद बँकेने मुदत ठेवीची मुदत संपली तरी जबरदस्तीने नूतनीकरण केले त्याचीही मुदत संपली तरी करोडो रुपये दिले गेले नाहीत. करोडो रुपयांची मुदत ठेव अडकल्याने पवनराजे निंबाळकर बँकही यामुळे अडचणीत आली आहे.
अरविंद व पवनराजे निंबाळकर बँकेचे हे प्रकरण ग्राहक मंचात 2015 साली गेले होते मात्र वादी व प्रतिवादी यांच्यात ग्राहकाचे नाते सिद्ध होत नसल्याने प्रकरण चालविण्याचा अधिकार नसल्याचे आदेशात नमूद करीत प्रकरण निकाली काढले तेव्हापासून ही रक्कम मिळाली नाही.
पवनराजे निंबाळकर बँकेने 24 जुलै व 1 ऑक्टोबर 2010 रोजी 25 लाख रुपयांची रक्कम 14 व 12 टक्के व्याजदराने टाकली होती त्याची मुदत 2015 साली संपली मात्र अद्याप मुदतठेवीचे व त्यावरील व्याजाची रक्कम मिळाली नाही. 12 ऑगस्ट, 6 सप्टेंबर व 19 सप्टेंबर 2011 रोजी 40 लाख 12 टक्के व्याजदराने अरविंद बँकेत मुदतठेव ठेवली त्याची मुदत 2015 साली संपली तर 3 एप्रिल 2012 रोजी 50 लाख पवनराजे बँकेने 13 टक्के व्याजदराने अरविंद बँकेत टाकले त्याची मुदत जुलै 2015 साली संपली.
अरविंद नागरी बँकेत पवनराजे बँकेने तब्बल 1 कोटी 15 लाख रुपये टाकले त्याची मुदत 2015 साली संपली त्यानंतर 8 वर्ष झाले तरी अद्याप त्यातील एकही रुपया मिळालेला नाही. व्याजासह ही रक्कम 3 कोटीच्या आसपास जाते. आमचे मुदतठेव पैसे अरविंद बँकेत असुन ते मिळण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत असल्याचे चेअरमन डॉ जयप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितले.
अरविंद पतसंस्थेच्या लेखापरिक्षण अहवालात गंभीर बाबी व दोष दिसून आल्याने सहकार विभागाने कलम ८८ नुसार या पतसंस्थेची चौकशी प्रस्तावित केली आहे. सहाय्यक निबंधक डॉ. अंबिलपुरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. पतसंस्था स्थापन झालेल्या तारखेपासून संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार तपासले जाणार आहेत त्यानंतर अनेक बाबी समोर येणार आहेत.
वसंतदादा बँकेचे फरार आरोपी पोलिसांना सापडेनात
वसंतदादा बँकेने ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी धाराशिव येथील शहर पोलीस ठाण्यात २७ जुलै रोजी तत्कालिन चेअरमन विजय दंडनाईक, तत्कालिन व्यवस्थापक दीपक देवकते, तत्कालिन संचालक मंडळ यांच्या विरोधात विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींचा अटकपुर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. एक महिना उलटून गेला तरी एकही आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.