पळसवाडी रस्ता प्रकरण – आमदार धस यांच्या तक्रारीनंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश
धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील पळसवाडी हद्दीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम सुरु असुन रस्ता करताना तो योग्य पद्धतीने मोजणी न करता व चारी न खोदता केल्याची तक्रार विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे. या तक्रारीनंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी यांना शेतकरी यांच्या तक्रारी तपासून कार्यवाही करावी असे आदेश दिले आहेत.
पळसवाडी रस्ता करताना दोन्ही बाजूनी सरकारी जागा उपलब्ध असताना खासगी शेतकरी यांच्या जागेतून रस्ता व पाणी जाण्यासाठी चर खोदली आहे. काही ठिकाणी आवश्यकता नसताना चारी खोदून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. काही जणांचे हितसंबंध जपण्यासाठी व सरकारी जमीन वापरायला मिळावी यासाठी सरकारी अधिकारी यांनी हे काम केले आहे, याबाबतच्या तक्रारी कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यांच्याकडे केली मात्र त्यांनी दखल न घेतल्याने शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले तरी सरकारी मोजणी करुन योग्य रुंदीचा व दोन्ही बाजूने पाणी जाण्यासाठी चर खोदून काम करावे अशी मागणी आमदार धस यांनी केली आहे.