पदोन्नतीचे बनावट आदेश – महसूल मंत्री यांचे सचिव खेडकर यांच्यासह अन्य नावे, गुन्हा नोंद
उस्मानाबाद – समय सारथी
राज्याच्या महसूल खात्यात पदोन्नतीचे बनावट आदेश काढण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली असून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे सचिव खेडकर यांच्यासह अन्य पाच अधिकारी यांचे बनावट बदली आदेश काढले आहेत, याप्रकरणी मुंबई येथील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी महसूल विभागाचे अवर सचिव अ. जे. शेट्ये यांनी गुन्हा दाखल केला आहे.
महसूल खात्यातील 5 बड्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे बनावट आदेश काढल्याचे समोर आल्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महसूल खात्यात अप्पर जिल्हाधिकारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे बनावट आदेश काढले आहेत. बनावट आदेशाने महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
महसूल मंत्री यांचे सचिव रामदास खेडकर यांच्यासह उमेश महाजन, संकेत चव्हाण, मनीषा वाजे, धनंजय निकम या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे बनावट आदेश काढले आहेत. शासनाचे सहसचिव डॉ माधव वीर यांच्या नावे हे आदेश काढण्यात आले आहेत. या प्रकरणात कोणाचा हात आहे हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
महसूल मंत्र्यांच्या कार्यालयातील अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर पदाेन्नतीने प्रधान खासगी सचिव महसूल या पदावर तर उन्मेश महाजन यांची गाेंदिया जिल्हाधिकारीपदी, ठाणे मनपा अतिरिक्त आयुक्त संकेत चव्हाण यांची याच ठिकाणी पदाेन्नती दाखविण्यात आली. अमरावतीचे अपर जिल्हाधिकारी मनीषा वाजे यांची अमरावती मनपा अतिरिक्त आयुक्तपदी तर भंडारा जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांची त्याच ठिकाणी जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आले.