पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट , विमा कंपनी प्रतिनिधीकडुन धक्कादायक प्रकार
फोन पे वर घेतले शेतकऱ्यांकडुन पंचनाम्यासाठी पैसे
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी प्रत्येकी 100 ते 300 रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला आहे , विशेष म्हणजे विमा कंपनीच्या पंचनामा करणाऱ्या व्यक्तीने ही रक्कम शेतकऱ्यांकडुन ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतली आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना विमा प्रतिनिधी पैसे मागून लुटत आहेत.
नितीन पाठक व रणजित विधाते यांच्याकडून ऑनलाईन रक्कम घेतली असुन अशी अनेक उदाहरणे या गावात आहेत.विधाते यांनी मुहिब अजिजुर रहेमान यां नावाच्या मोबाईल नंबर ८८८८५३९४३७ या खात्यावर फोन पेद्वारे ३०० रुपये जमा केले तर पाठक यांनी २०० रुपये जमा केले , शेतकरी आता या लुटीची कागदपत्रे पुराव्यासह दाखवीत आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील कारी शिवारात बजाज अलायन्झ पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीने जाऊन पंचनामे केले.पंचनामा करताना त्या प्रतिनिधीने अनेक शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी केली. ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले अशा शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची टक्केवारी जास्ती प्रमाणात दाखविण्यात आली. ज्यांनी पैसे देण्यास असमर्थता दाखविली त्यांचे नुकसान झालेले असतानादेखील अगदी अल्प दाखविण्यात आले. शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे,
शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या विमा कंपनी व प्रतिनिधीवर गुन्हे नोंद करावे अशी मागणी भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी तुळजापूर येथे दिंडी यात्रेच्या समारोप प्रसंगी केली आहे.