पंचतारांकीत रेसॉर्ट ‘विवांत’ अखेर सील – पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांची कारवाई
धडा शिकवला – कोरोना काळात कारवाई करूनही सुरू होते लग्न सोहळे
नाशिक – समय सारथी
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पंचतारांकीत रेसॉर्ट ‘विवांत’ ला अखेर सील करण्यात आले असून पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या आदेशानंतर महसुल व पोलीस विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. विशेष म्हणजे विवांत रेसॉर्टला कोरोना काळात नियम मोडल्याप्रकरणी 20 हजाराच्या दंडासह 2 वेळेस कारवाई केली होती मात्र त्याची मुजोरी कायम होती व रेसॉर्टमध्ये विवाह सोहळे , कार्यक्रम सुरूच ठेवले होते. थेट प्रशासकीय यंत्रणेला आव्हान देणाऱ्या पंचतारांकित रेसॉर्टला सील करून पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी चांगलाच धडा शिकवला आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील तळेगाव परिसरात मुंबई आग्रा महामार्गलगत पंचतारांकित रेसॉर्ट विवांत आहे या ठिकाणी शासनाने कोविड प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले असतानाही सलग 2 दिवस विवाह सोहळे आयोजित करीत शेकडो लोकांची गर्दी जमविण्यात आली होती.याबाबत माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी कारवाईचे आदेश देत रेसॉर्ट सील करण्यात आले. यापूर्वी या हॉटेलला नियम न पाळल्याने 20 हजारांचा दंड करून तो वसुल करण्यात आला होता तरी देखील 30 मे ला विवाह सोहळा आयोजित केला गेला.
31 मे रोजी सोमवारी पोलीस अधीक्षक पाटील यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक अर्जुन भोसले व तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी रेसॉर्ट मालक हरनाम शेट्टी व व्यवस्थापक हुकूमचंद धामी यांना नोटीस देऊन रेसॉर्ट सील केले.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व हॉटेल , धाबे, रेसॉर्ट या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम व गर्दी करायला बंदी असतानाही रेसॉर्ट विवांतच्या चालकाकडून नियमांचे उल्लंघन झाल्याने पुढील आदेश येईपर्यंत सील करण्यात आले आहे तरी इतर चालकांनी यातून बोध घ्यावा व नियमांचे उल्लंघन करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.