नौकर भरती घोटाळा – आमदार धस यांची जिल्हाधिकाऱ्याकडे चौकशीची मागणी
धाराशिव व तुळजापूर नगर परिषद अंतर्गत आस्थापनेवरील दिवंगत कर्मचार्यांच्या वारसास, पाल्यास अनुकंपातत्वावर नियुक्ती देण्याचे अनुषंगाने नगर परिषदेतील झालेल्या अनियमिततेबाबत चौकशी समिती नेमून फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
नगर परिषदेचे तत्कालीन निलंबीत मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्या कार्यकाळामध्ये अनुकंपातत्वावर झालेल्या धाराशिव व तुळजापूर नगर परिषदेमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने स्थायी पदाच्या 20 टक्के अनुकंपातत्वावर पदे भरणे आवश्यक होते. परंतु पदे रिक्त नसताना ही पदे भरण्यात आलेली आहेत. अस्थायी पदावर भरती करताना आस्थापनावरील खर्चाची मर्यादा पाहणे आवश्यक आहे. नगर पालिकेचे स्थायी निर्देश शासनाने वेळोवेळी केलेल्या अनुकंपा भरतीच्या बाबतच्या आदेशाची पायमल्ली केलेली आहे. सदरील पदभरती करताना सर्वच गोष्टींची पायमल्ली केलेली असल्या कारणाने मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्या कार्यकाळातील अनुकंपा तत्वावर भरती झालेल्या कर्मचार्यांची तसेच पदभरतीची वरिष्ठ पातळीवरुन आपल्या स्तरावर चौकशी समिती नेमुन सखोल चौकशी करावी तसेच दोषींवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि सदरील अहवाल व केलेल्या कार्यवाहीची माहिती विधीमंडळ कामकाजासाठी द्यावी अशी मागणी आमदार धस यांनी केली आहे .