नोटीसा जारी – अंतीम संधी, धाराशिव नगर परिषदेतील 20 कोटींच्या घोटाळ्यात कारवाईला वेग
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या चौकशी अहवालानंतर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अहवालाच्या अनुषंगाने तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यासह अन्य कर्मचारी यांना खुलासा करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मुख्याधिकारी वसुधा फड यांना पत्र देऊन जबाबदार दोषी कर्मचारी यांची नावे व इतर माहिती अहवालासह देण्यास सांगितले आहे. कारवाईची दिशा ठरली असुन आगामी काही दिवसात दोषी अधिकारी व कर्मचारी यांची वाईट दशा होणार आहे. इतके दिवस मुख्याधिकारी यलगट्टे हे एकटेच प्रशासकीय व फौजदारी कारवाईच्या कचाट्यात होते मात्र आता व्याप्ती वाढली असुन इतर विभाग प्रमुख, लेखा विभाग रडारवर आहे.
चौकशी अहवालात ठेवण्यात आलेल्या ठपक्याच्या अनुषंगाने तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे, लेखा विभागातील बोर्डे, पवार यांना 7 दिवसात लेखी खुलासा करण्याची नोटीस देण्यात आली आहे त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल. धाराशिव नगर परिषदेत 18-20 कोटी रुपयांची आर्थिक अनियमितता समोर आली असुन अपहारासह अन्य बाबींचा ठपका ठेवण्यात आला आहे. काही बाबींचे मुल्यमापन सुरु असल्याने 20 कोटींची रक्कम जवळपास 30-35 कोटींच्या घरात जाऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे हे स्वतः ह्या कारवाईवर लक्ष ठेवून असल्याने दोषी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
अनेक संचिका, कागदपत्रे व व्हाऊचर चौकशी समितीला देण्यात आले नसून ते गहाळ असल्याचे समोर आल्याने याबाबत कोण कोण अधिकारी व कर्मचारी दोषी असणार आहे. त्याची माहीती देण्याचे पत्र मुख्याधिकारी फड यांना देण्यात आले असुन कार्यालयीन कामकाजाच्या 3 दिवसात त्यांच्याकडून ही माहिती आल्यावर कारवाईचे स्वरूप निश्चित होणार आहे. सकृतदशनी अनेक गंभीर चुका समोर आल्या असुन फौजदारी गुन्ह्यांसह प्रशासकीय चौकशीचा ससेमीरा मागे लागणार आहे. बांधकाम व पाणी पुरवठा विभागातील अनेक संचिका गहाळ असुन त्यात फौजदारी कारवाई होणार आहे, अनेक संचिका ठेकेदार व काही कर्मचारी यांच्याकडे असल्याची माहिती आहे.