उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांची बदली उपायुक्त मुंबई शहर येथे झाल्यानंतर त्यांनी मंगळवारी पदभार नुतन पोलीस अधीक्षक निवा जैन यांच्याकडे दिला. जैन यांची समादेशक राज्य राखीव पोलीस बल, गट 1 पुणे येथून उस्मानाबाद पोलीस अधीक्षकपदी नेमणुक झाली आहे. जैन यांच्या रूपाने उस्मानाबाद जिल्ह्याला प्रथम महिला पोलीस अधीक्षक पदाचा मान मिळाला आहे.
2008 च्या बॅचच्या आयपीएस असलेल्या पोलीस अधीक्षक निवा जैन यांना केंद्राने शौर्य पुरस्कार देऊन गौरवीत केले आहे. पोलीस ठाण्यावर सशस्त्र हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या निवा जैन यांना केंद्र शासनाने शौर्यपदकाने सन्मामिन केले आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे पोलीस अधीक्षकपदावर असताना ही धाडसी कामगिरी बजावली होती. कठुआ येथील राजबाग पोलीस ठाण्यावर २५ मार्च २०१५ रोजी दहशतवाद्यांनी हल्ला चढविला होता. त्यावेळी पोलीस व दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. ती स्थिती हाताळताना निवा जैन यांनी धाडसी वृत्तीने दहशतवाद्यांना चोख प्रतिउत्तर दिले. पोलीस व सामान्यांची जाणीव ठेऊन त्यांनी जीवतहानी होऊ न देता दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. याची दखल घेत केंद्र शासनाने पोलिस मेडल फॉर गॅलन्ट्री अवॉर्ड (शौर्यपदक) जाहीर केले. निवा जैन यांना महाराष्ट्रात पहिली नियुक्ती अमरावती येथे मिळाली त्यानंतर पुणे व आता उस्मानाबाद येथे मिळाली आहे.