निर्बंध जैसे थे – उस्मानाबाद जिल्ह्याचा पुन्हा लेवल 3 मध्ये समावेश, आकडे वाढले
कोरोना चाचणीत 5.21 टक्के पॉझिटिव्हीटी दर तर 14.8 टक्के बेड वापर
उस्मानाबाद – समय सारथी
कोरोना रुग्णांची संख्या व चाचणीत रुग्ण सापडण्याचे प्रमाण उस्मानाबाद जिल्ह्यात कमालीचे कमी झाले आहे मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत बेड वापर वाढला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश लेवल 3 मध्ये असुन पूर्वी लागू असलेले नियम व निर्बंध कायम असतील असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याचा कोरोना चाचणीत रुग्ण सापडण्याचा पॉझिटिव्हीटी दर हा 5.24 टक्के आहे तर 14.81 टक्के बेड वापर आहे. गेल्या आठवड्यात पॉझिटिव्हीटी दर हा 5.16 टक्के तर बेड वापर हा 8.13 टक्के होता त्यात या आठवड्यात वाढ झाली आहे. जिल्हाधिकारी यांनी लागू केलेले आदेश हे 21 जुन पासून पुढील आदेश येइपर्यंत लागू असणार आहेत.
गेल्या आठवड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात 12 हजार 678 रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली त्यात 660 रुग्ण म्हणजे 5.21 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहे. जिल्ह्यात 14.81 टक्के बेड वापरात आहेत त्यामुळे उस्मानाबादचा समावेश लेवल 3 मध्ये करण्यात आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याची स्तिथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची ऍक्टिव्ह संख्या ही पुन्हा एकदा 1 हजाराच्यावर गेली आहे. शुक्रवारी उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 141 रुग्ण सापडले त्यात लोहारा तालुक्यातील सर्वाधिक 51 रुग्णांचा समावेश आहे. आज 138 रुग्ण उपचार नंतर बरे झाले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 57 हजार 508 रुग्ण सापडले त्यापैकी 55 हजार 229 रुग्ण उपचारानंतर बरे झाले , जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर हा 97.87 टक्के आहे तर कोरोनाने आजवर 1 हजार 358 जणांचा मृत्यू झाला आहे हा दर 2.35 टक्के आहे.
शुक्रवारी उस्मानाबाद जिल्ह्यात 2 हजार 275 जनाची कोरोना चाचणी करण्यात आली त्यातील 141 जण पॉझिटिव्ह सापडले हा पॉझिटिव्हीटी दर 6.19 टक्के आहे. त्यात 116 रॅपिड तर 25 जण आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह सापडले.
लेवल 3 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश असल्याने नियम व निर्बंध कायम राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा व वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना व दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद राहणार आहेत. हॉटेल रेस्टोरेंट, खानावळ व उपहारगृह यांना मात्र शनिवारी व रविवारी घरपोच सेवा देता येणार आहे. सांयकाळी ५ वाजेपर्यंत जमावबंदी तर त्यानंतर संचारबंदी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेली किराणा दुकाने व भाजीपाला फळ,बेकरी व कृषी विषयक दुकाने शनिवारी व रविवारी सुरु राहतील तर इतर दुकाने ही 2 दिवस बंद राहतील. रविवारी जनता कर्फ्यु नसणार आहे मात्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहतील आणि जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू राहतील. वैद्यकीय सेवा, दवाखाने, लसीकरण सेवा 24 तास सुरु राहतील.सर्व दुकाने , आस्थापना व खासगी आस्थापनाची कार्यालये सोमवार ते शुक्रवार सुरु राहतील.
अत्यावश्यक सेवा व वस्तूंची दुकाने आणि व्यवसाय दररोज सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील तर या सेवा वगळता इतर दुकाने व आस्थापना हे शनिवारी व रविवारी बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील रुग्णालये वैद्यकीय सेवा २४ तास सुरु राहतील.
अत्यावश्यक सेवेत पशुवैद्यकीय सेवा व खाद्याची दुकाने, वन विभागाने जाहीर केलेली कामे, सर्व किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विक्रेते, दूध संकलन व वितरण केंद्र आणि बेकरी,मिठाई, चिकन, मटण, पोल्ट्री, मासे व अंडी विक्री हि खाद्यपदार्थाची दुकाने, शीतगृहे व वखार, सार्वजनिक वाहतूक, स्थानिक प्राधिकरण व विभागाची सर्व मान्सूनपूर्व करण्यात येणारी कामे, रिझर्व्ह बँकेने अत्यावश्यक म्हणून निर्देशित केलेल्या सेवा,पाणीपुरवठा व कृषी विषयक उपक्रम व अवजारे, बियाणे, खते, उपकरणे व दुरुस्तीची दुकाने, आयात- निर्यात विषयक सर्व सुविधा, ई वाणिज्य सेवा, मान्यता प्राप्त प्रसार माध्यमे,पेट्रोल पंप, शासकीय व खासगी सुरक्षा सेवा, विद्युत व गॅस सिलेंडर पुरवठा, एटीएम, पोस्ट विभागाच्या सेवा, आगामी पावसाळा ऋतूच्या अनुषंगाने आवश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग यांचा समावेश आहे. या आस्थापना दररोज सकाळी ७ ते ४ वाजेपर्यंत सुरु राहतील असे आदेशित आहे.
सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, बाग व उद्यान, क्रीडा दररोज सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरु राहतील तर जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा व वेलनेस क्लब हे दररोज सांयकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील असे आदेशित केले आहे त्यामुळे यासेवा शनिवारी व रविवारीही सुरू राहतील.