नियोजन बैठक – महाआरोग्य शिबिराची तयारी, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत
स्वतंत्र अँप, आरोग्य कार्ड बनणार – घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलन
उस्मानाबाद – समय सारथी
राज्यातील प्रत्येक व्यक्ती सुदृढ व निरोगी व्हावा यासाठी आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी ‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा’ असा नारा दिला असून महाआरोग्य शिबिरापासून या मोहिमेची सुरूवात परंडा येथून केली जाणार आहे. या शिबिराच्या नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, या बैठकीत नियोजनाची सविस्तर चर्चा झाली असून नियोजनासाठी लागणाऱ्या सर्व समिती गठीत केल्या जाणार आहेत. 27 नोव्हेंबर रोजी रविवारी परंडा येथील कोटला येथे महाआरोग्य शिबीर होणार आहे. सर्व विभाग प्रमुखांना वेगवेगळी जबाबदारी दिली गेली आहे.
‘प्रत्येक घरातील व घरातील प्रत्येकाची’ घरोघरी जावून सर्वेक्षण केले जाणार असून, त्यानंतर महाआरोग्य शिबीर मेळाव्यात मोफत तपासणी व पुढील उपचार केले. या आरोग्य शिबीरास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सिने क्षेत्रातील विविध कलावंत व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध मान्यवर ऑनलाईन पध्दतीने यात सहभाग घेणार आहेत.
महाआरोग्य शिबिरात येणाऱ्या महिला व पुरूष रुग्णांची स्वतंत्र व्यवस्था या शिबीरात असणार असून, घरापासून शिबीरापर्यंत नेन्यासाठी व शिबीर संपल्यावर घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था आरोग्य मित्र यांच्या मार्फत केली जाणार आहे. या आरोग्य शिबीरास जिल्ह्यातील डॉक्टरांसह 5 तज्ञ डॉक्टर्स हे परदेशातुन येणार असून, 50 तज्ञ डॉक्टरांचे पथक या शिबीरात रुग्णसेवा देणार आहेत. या शिबीरात रुग्णांची रक्त तपासणीसह अन्य तपासण्या करण्यात येणार असून, महिलांची कॅन्सरबाबतची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे.
आरोग्य शिबीरासाठी एक स्वतंत्र मोबाईल अॅप तयार करण्यात आले असून त्यामध्ये रुग्णांची प्राथमिक माहिती, शिबीरात करण्यात आलेल्या चाचण्या, निदान यासह पुढील उपचार व पाठपुरावा केला जाणार आहे. शिबीरात दिव्यांगाना लागणारी साहित्य, ज्येष्ठ नागरिकांनासाठी लागणारे चष्मे व इतर औषधी मोफत देण्यात येणार आहेत. नागरिकांची मोफत तपासणी व गरजेनुसार पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या शिबीरामुळे या तीन तालुक्यातील नागरिकांचे एक प्रकारे आरोग्यकार्ड बनणार आहे.
आशा व अंगणवाडी सेवक, सेविका यांचे पथक गावोगावी व घरोघरी जाऊन रुग्णांची प्राथमिक तपासणी करणार आहेत.आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे आरोग्य दुत बनले असून त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात महत्वाचे निर्णय घेत वचनपुर्ति केली आहे