नायब तहसीलदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात – दरमहा रेशन दुकानदाराकडुन हप्ता वसुली
धाराशिव – समय सारथी
रेशन दुकानदार यांच्याकडून दरमहा हप्ता वसुली प्रकरणात धाराशिव येथील पुरवठा विभागाचे तत्कालीन नायब तहसीलदार राजाराम इरण्णा केलुरकर यांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. केलूरकर हे सध्या उमरगा तहसील कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी संबंधित तक्रारदार रेशन दुकानदार नागेश जगदाळे यांच्याकडे 19 मे व 4 सप्टेंबर रोजी 9 हजार लाचेची मागणी केली होती मात्र त्यांना संशय आल्याने ती स्वीकारली नाही त्यामुळे मागणीचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
यातील तक्रारदार व त्यांचे 2 मित्र यांचे रास्त भाव धान्य दुकानाचे धान्य मागणीपत्रावर सही करण्यासाठी व दुकानावर कारवाई न करण्यासाठी केलूरकर यांनी तिघांचा 3 महिन्याचा मासीक हप्ता असे 9 हजारांची लाचेची पंचासमक्ष मागणी केली आहे. केलूरकर यांना ताब्यात घेण्यात आले असुन याबाबत पोलीस ठाणे आनंदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
पोलीस अधीक्षक, संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक, विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.सापळा पथककात पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके, नागेश शेरकर यांचा समावेश होता.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर कार्यालय 02472 222879 व टोल फ्री क्रमांक1064 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे