नगर परिषदेचा चौकशी अहवाल शिफारशीसह सादर – जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांच्या कारवाईकडे लक्ष
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेतील विविध योजनांची चौकशी पुर्ण झाली असुन चौकशी समितीने स्वयंस्पष्ट अभिप्रायसह अहवाल जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे सादर केला आहे. चौकशी अहवालात दडलंय काय ? यांची आता चर्चा होत आहे. चौकशीत अनेक धक्कादायक बाबीसमोर आल्याची सूत्रांची माहिती आहे. योजनाचा निधी परस्पर नियमबाह्य पद्धतीने इतरत्र वर्ग करुन खर्च करणे, व्हाऊचर व महत्वाची कागदपत्रे गहाळ असणेसह प्रचलीत कार्यपद्धती आणि नियमांचा भंग केल्याची प्राथमिक माहिती आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कारवाईच्या बाबतीत निर्णय घेऊन निर्देश देऊ शकतात.
कधी कागदपत्र गहाळ तर कधी ती शोधण्याची धावपळ, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या 2 वेळेस आठवडी सुट्टया रद्द करणे यासह चौकशी समितीला कागदपत्रे मिळावीत यासाठी तब्बल 7 वेळा लेखी स्मरणपत्रे अश्या अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत अखेर चौकशी पुर्ण झाली असुन अहवाल जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांच्याकडे सादर केला आहे.
चौकशीतील कार्यकाळ हा विविध घोटाळा व गुन्हे नोंद असलेले तत्कालीन निलंबित मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांचा आहे. महाराष्ट्र लेखासंहिता 2011 नियम क्र 62,315,317, 450 मध्ये अनुदान प्राप्त नोंदवही नमुना क्र 26 चा 7 जुलै 2020 ते 23 नोव्हेंबर 2022 या कालावधीतील नमुना, नगर परिषद यांना लागू असलेल्या सर्व योजनाच्या बँक खात्याची यादी व बँक विवरणपत्र, सर्व योजना अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्व कामांच्या संचिका व प्रमाणके, बँक ताळमेळ विवरणपत्र, सर्वसाधारण बँक पुस्तक नुमना व बँक खातेनिहाय नोंदवही या चौकशीत तपासण्यात आल्या, त्यानुसार अंतिम अहवाल सादर केला आहे.
जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी गोविंद बोंदर यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही चौकशी केली.10 एप्रिल पासुन चौकशी सुरु करुन 7 दिवसात चौकशी संपविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते मात्र जिल्हाधिकारी यांनी दट्टा लावल्यानंतर एक महिन्यात चौकशी पुर्ण झाली.