धोकादायक – म्युकरमायकोसिसचा पहिला बळी उस्मानाबाद जिल्ह्यात
कोरोना पाठोपाठ नवे चिंताजनक संकट
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील एका रुग्णांचा म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगामुळे उपचारा दरम्यान सोलापूर येथे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिसचे नवीन संकट उभे राहिले असून यामुळे अनेक रुग्णांना दुष्परिणामला सामोरे जावे लागले आहे त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने याबाबत वेळीच उपाययोजना व औषधी साठा आणि यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अर्जुन उत्तरेश्वर लाकाळ ( रा पळसप ता उस्मानाबाद ) यांना कोरोनाची लागण झाली होती त्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते कोरोनातून बरे होत असतानाच त्यांच्या डोळ्याला म्युकरमायकोसिसची लागण झाली व सोलापूर येथे त्याचे उपचार सुरू असताना ऑपरेशन करून एक निकामी झालेला डोळा काढावा लागला त्यातच त्यांची प्रकृती खालावली व त्यांचा उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला , उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांचा हा पहिला म्युकरमायकोसिसचा बळी असून आणखी एक रुग्णही दगवल्याची माहिती हाती येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट संपलेले नसतानाच तिसरी लाट अमरावती जिल्ह्यात सुरू झाली असून त्यातच म्युकरमायकोसिसचा धोका वाढत आहे.
म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार आहे. हा आजार जुनाच आहे. परंतु, आता कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने तो बळावत आहे. कोरोनाच्या उपचारात रुग्णांना लागणाऱ्या स्टिरॉइड्स औषधांमुळे हा आजार बळावत असल्याचे दिसून येत आहे. या आजाराची प्रमुख लक्षणे अशी की, चेहऱ्याच्या एका भागाला अचानक सूज येणे, गाल सुजणे, डोळा सुजून बाहेर येणे, तोंडात किंवा नाकात फंगल इन्फेक्शन होणे, दात अचानक हलू लागणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. विशेष करून मधुमेह असलेल्या रुग्णांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. मधुमेह असलेल्यांना कोरोना झाला असेल आणि त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले असेल तर हा म्युकर मायकोसिस वेगाने वाढत जातो.
कोविडवर मात केलेल्या सरासरी १० टक्के रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराची गंभीर लक्षणं दिसत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे साहजिकच या बुरशीजन्य आजाराची दाहकता कमी करण्यासाठी एम्पोटेरिसीन बी, फोटॉन, लिपो सोमॉल यांसारख्या अँटिफंगस औषधांची मागणी पूर्वीच्या तुलनेत २०० पटींनी वाढली आहे.