धाराशिव व तुळजापूर नगर परिषदेत नौकर भरती घोटाळा – जिल्हाधिकाऱ्यांनी नेमली चौकशी समिती
धाराशिव – समय सारथी
धाराशिव व तुळजापूर नगर परिषद अंतर्गत आस्थापनेवरील दिवंगत कर्मचार्यांच्या वारसास अनुकंपातत्वावर नियुक्ती देण्याचे अनुषंगाने झालेल्या अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी 3 सदस्य असलेली समिती नेमली असुन 31 मे पर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तक्रार केली होती त्यानंतर ही समिती नेमली आहे. नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, कर निर्धारण अधिकारी अजय काकडे व मुरूम नगर परिषदेतील लिपीक उमाकांत देशपांडे यांचा या समितीत समावेश आहे.
नगर परिषदेचे तत्कालीन निलंबीत मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्या कार्यकाळामध्ये अनुकंपातत्वावर झालेल्या धाराशिव व तुळजापूर नगर परिषदेमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने स्थायी पदाच्या 20 टक्के अनुकंपातत्वावर पदे भरणे आवश्यक होते. परंतु पदे रिक्त नसताना ही पदे भरण्यात आलेली आहेत असा आरोप आहे.
अस्थायी पदावर भरती करताना आस्थापनावरील खर्चाची मर्यादा पाहणे आवश्यक आहे. नगर पालिकेचे स्थायी निर्देश शासनाने वेळोवेळी केलेल्या अनुकंपा भरतीच्या बाबतच्या आदेशाची पायमल्ली केलेली आहे. सदरील पदभरती करताना सर्वच गोष्टींची पायमल्ली केलेली असल्या कारणाने मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्या कार्यकाळातील अनुकंपा तत्वावर भरती झालेल्या कर्मचार्यांची तसेच पदभरतीची वरिष्ठ पातळीवरुन आपल्या स्तरावर चौकशी समिती नेमुन सखोल चौकशी करावी तसेच दोषींवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आमदार धस यांनी केली होती त्यानंतर ही समिती नेमली आहे, आता याचा अहवाल आल्यावर यातील तथ्य समोर येणार आहे.