धाराशिव लोकसभा – शिवसेनेचे मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर भाजपची सावध भुमिका
धाराशिव – समय सारथी
भाजपने धाराशिव लोकसभा जागेबाबत सावध पवित्रा घेत यु टर्न घेतला. धाराशिव लोकसभा जागेबाबत अंतीम निर्णय केंद्रीय नेतृत्व घेणार असुन बाकी चर्चेला आता पुर्णविराम असे सांगत भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी भुमिका स्पष्ट केली. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी धाराशिव लोकसभा जागेवर ही जागा परंपरागत शिवसेनेची आहे असे सांगत आक्रमक पवित्रा घेत दावा केला होता.
शिवसेना व मंत्री सावंत यांच्या आक्रमक भुमिका व पवित्रा नंतर भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. भाजप व शिवसेना पक्षाचे केंद्रीय नेतृत्व धाराशिव जागेबाबतचा अंतिम निर्णय घेणार त्यामुळे बाकीची जी चर्चा आहे त्याला पूर्णविराम आहे आणि जो अंतिम निर्णय नेते घेतील त्याप्रमाणे सर्वजण अंमलबजावणी करतील असे आमदार राणा पाटील म्हणाले
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी धाराशिव येथे भाजपचा खासदार होईल असे वक्तव्य केले होते त्यानंतर दोघात वाद पेटला आहे.
आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी कडक शब्दात भाजपला इशारा दिला होता. आम्हाला कोणी गृहीत धरून हलक्यात सहज घेतले तर ते आम्ही मान्य करणार नाही. आम्ही जिकूंन आलेली 18 पैकी एकही जागा भाजपला सोडणार नाही. आमचा गट वेगळा आहे, आमचे अस्तित्व वेगळे आहे. आम्ही शिवसेना आहोत, पारंपरिक जागा आमच्याकडे आहे. 2024 ची धाराशिव लोकसभा जागा शिवसेनाच लढवणार असे सांगत रणशिंग फुंकले होते.
धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून भाजप शिवसेना वाद पेटला होता मात्र भाजपणे सावध पवित्रा घेतल्याने तूर्तास पुर्णविराम पडला आहे. सध्या शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे धाराशिव लोकसभा मतदार संघांचे खासदार आहेत.